IPL 2020 – दिल्लीचा 88 धावांनी धुव्वा, हैद्राबाद ‘प्ले ऑफ’च्या रेसमध्ये कायम

मंगळवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध ‘करो या मरो’ लढतीत सनरायझर्स हैद्राबाद संघाने 88 धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयामुळे हैद्राबादचा रनरेट देखील सुधारला असून यामुळे प्ले ऑफची चुरस आणखी वाढली आहे.

हैद्राबादने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 2 बाद 219 धावांचा डोंगर उभारला. कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि ऋद्धिमान साहा याने वादळी खेळी केली.
वॉर्नरने 66 तर साहाने 87 धावा केल्या.  वॉर्नरने ऋद्धिमान साहा याच्या सोबत पहिल्या विकेटसाठी 107 धावांची सलामी दिली. मनीष पांडे याने 44 धावा करत संघाला 200 धावांचा टप्पा ओलांडून दिला.

47 वे अर्धशतक

डेव्हिड वॉर्नर याने 25 चेंडूत अर्धशतक ठोकले. रबाडाच्या गोलंदाजीवर चौकार ठोकून त्याने अर्धशतकाला गवसणी घातली. यंदाच्या सिझनमधील त्याची ही तिसरी तर आयपीएल कारकिर्दीतील 47 वी अर्धशतकीय खेळी आहे.

ढिसाळ सुरुवात

मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना चांगली सुरुवात मिळणे आवश्यक असते, मात्र फलकावर 1 धाव असताना धवन शून्यावर बाद झाला. यानंतर दिल्लीचे फलंदाज एकामागोमाग एक बाद होत गेले.

रशीदच्या फिरकीची कमाल

हैद्राबादचा फिरकीपटू रशीद खान याने आयपीएल कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी केली. रशीदने आज 4 षटकात फक्त 7 धावा दिल्या आणि हेटमायर, रहाणे व अक्षर पटेल हे मोठे मासे फिरकीच्या जाळ्यात अडकवले.

दमदार गोलंदाजी

रशीद खान व्यतिरिक्त हैद्राबादच्या अन्य गोलंदाजांनी दमदार खेळ करत दिल्लीला 131 धावांमध्ये रोखले. संदीप शर्मा आणि टी. नटराजनने प्रत्येकी 2, तर शंकर, नदीम आणि होल्डरने प्रत्येकी 1 बळी घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या