IPL 2025 suspended – सुरक्षेच्या कारणास्तव आयपीएलचा उर्वरित हंगाम स्थगित, बीसीसीआयचा निर्णय

हिंदुस्थान आणि पाकिस्तानच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव बीसीसीआयने इंडियन प्रीमियर लीगचा उर्वरित हंगाम एक आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

हिंदुस्थानी सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यानंतर गुरुवारी सीमेवर युद्धसदृश स्थिती निर्माण झाली. त्यामुळे धर्मशाळेत सुरू असलेला पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना 10.1 षटकांनंतरच थांबवत तो रद्द करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला. त्यानंतर बीसीसीआयची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये आयपीएलचा उर्वरित हंगाम एक आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यामुळे आजपासून आयपीएलचा एकही सामना खेळला जाणार नाही. सध्या खेळाडूंच्या सुरक्षेला बीसीसीआयचे पहिले प्राधान्य आहे. दरम्यान, आयपीएलचे आणखी 16 सामना बाकी असून युद्धसदृश परिस्थिती निवळल्यानंतर बीसीसीआय उर्वरित हंगामाच्या लढतींसाठी नवीन तारखांची घोषणा करण्याची शक्यता आहे.