
कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी आता उर्वरित तीनही सामने जिंकावे लागणार आहेत. दुसरीकडे गुणतक्त्यात रसातळाला असलेल्या चेन्नई सुपर किंग्जचे स्पर्धेतील आव्हान आधीच संपुष्टात आलेले आहे. त्यामुळे या संघावर कुठलेही दडपण नसेल. याचाच फटका कोलकाता संघाला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोलकात्याला उद्या (दि. 7) विजयासाठी सर्वच आघाडय़ांवर सरस खेळ करावा लागला, एवढं नक्की.
गतसामन्यान कोलकात्याने चेन्नईवर एकतर्फी विजय मिळविला होता. त्या पराभवाचा बदला घेण्याची संधी धोनी अॅण्ड कंपनीला असेल. चेन्नईच्या संघाने 11 लढतींत केवळ दोनच विजय मिळविले असले तरी त्यांच्याकडेही मॅचविनर खेळाडूंची कमी नाही. आता गमविण्यासारखे काहीच नसल्याने नैसर्गिक आणि बिनधास्त खेळण्याच्या नादात ते कोलकात्याचा पराभव करून मागील पराभवाचे उट्टे काढू शकतात. आयुष म्हात्रे, सॅम करण, रवींद्र जाडेजा, शिवम दुबे व दीपक हुड्डा असे मॅचविनर फलंदाज या संघाकडे आहेत. याचबरोबर खलील अहमद, नूर अहमद, रवींद्र जाडेजा, मथिशा पथिराना व सॅम करण असा फलंदाजी ताफाही या संघाच्या दिमतीला आहे.
दुसरीकडे कोलकात्याकडे वरूण चक्रवर्ती व सुनील नरीन अशी स्पर्धेतील सर्वोत्तम फिरकीची जोडगोळी आहे. शिवाय वैभव अरोरा, मोईन अली, हर्षित राणा या गोलंदाजांमध्येही कुठलाही फलंदाजीक्रम उद्ध्वस्त करण्याची क्षमता आहे. याचबरोबर कोलकात्याकडेही क्विंटन डिकाॅक, सुनील नरिन, कर्णधार अजिंक्य रहाणे, रिंकू सिंग, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रस्सेल असे एकाचढ एक फलंदाज आहेत. फ्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी त्यांना मोठय़ा विजयाची गरज आहे. त्यामुळे चेन्नईवर पुन्हा एकदा मोठा विजय मिळविण्यासाठी कोलकात्याचे खेळाडू मैदानावर सर्वस्व पणाला लावताना दिसतील.