
IPL 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा शेवटचा सामना गुजरात टायटन्सविरुद्ध पार पाडला. या सामन्यात चेन्नईने दमदार कामगिरी करत गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर विराजमान असलेल्या गुजरातचा 83 धावांनी पराभव केला. या सामन्यानंतर चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या. संपूर्ण स्पर्धेत धोनीची बॅट काही तळपलीच नाही. त्यामुळे सोशल मीडियावर सुद्धा त्याच्यावर जोरदार टीका झाली. सामना संपल्यानंतर धोनीने एक वक्तव्य केलं, ज्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे.
महेंद्र सिंग धोनी सामना संपल्यानंतर म्हणाला की, “मी अस नाही म्हणत की मी क्रिकेट सोडलं आहे, आणि मी असं पण नाही म्हणत की मी पुन्हा येणार आहे”. धोनीच्या या वक्तव्याने सर्वांनाच चकित केलं आहे. धोनीच्या याच वक्तव्यावरून टीम इंडियाचा माजी खेळाडू मुरली कार्तिकने आपलं मत व्यक्त करत धोनीच्या निवृत्तीची हीच योग्य वेळ असल्याच म्हटलं आहे. कार्तिक म्हणाला की, जग धोनीवर जेवढं प्रेम करत तितकेच आपल्याला काही गोष्टी कधीच संपू नये असं वाटत. जसे की, अमिताभ बच्चन यांनी कधीही अभिनय सोडू नये किंवा सचिन तेंडुलकरचे करिअर संपू नये, असं आपल्याला वाटत. पण एक दिवस त्यांना थांबावच लागेल. पण आपल्यावर प्रेम करणाऱ्या लोकांनीही ‘बस झालं, तु खूप खेळलास’, असं म्हणायला सुरुवात करावी, हे कोणालाही आवडणार नाही.” असं कार्तिक म्हणाला आहे.