
IPL 2026 च्या पहिल्याच सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा (LSG) कर्णधार ऋषभ पंतने स्वतःला फलंदाजीच्या क्रमवारीत वर बढती दिली, मात्र या निर्णयावर इंग्लंडचा माजी दिग्गज फलंदाज केविन पीटरसनने साशंकता व्यक्त केली आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात पंत केवळ 7 धावा काढून धावबाद झाला. “पंतने फलंदाजीच्या क्रमवारीत स्वतःला खूप पुढे ढकलले आहे का?” असा प्रश्न विचारत, या निर्णयामुळे त्याच्यावर अनावश्यक दबाव निर्माण होऊ शकतो, असे पीटरसनने म्हटले आहे.
पीटरसनच्या मते, लखनऊच्या फलंदाजीची खोली पाहता पंतने सलामीला किंवा तिसऱ्या क्रमांकावर येणे योग्य नाही. जिओ-हॉटस्टारशी बोलताना तो म्हणाला, “ऋषभने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फलंदाजीच्या क्रमवारीत खूप मोठी उडी घेतली आहे. त्याने केवळ मैदानात जाऊन आपल्या खेळाचा आनंद घ्यायला हवा. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी स्वतःवर जबरदस्ती करू नये, कारण यामुळे त्याच्या नैसर्गिक खेळावर परिणाम होऊ शकतो.”
दुसरीकडे, पीटरसनने दिल्ली कॅपिटल्सच्या समीर रिझवीचे भरभरून कौतुक केले. 26 धावांत 4 गडी बाद झाले असताना रिझवीने नाबाद 70 धावांची खेळी करत दिल्लीला विजय मिळवून दिला. “रिझवी हा एक परिपक्व खेळाडू आहे आणि अशा कठीण परिस्थितीत त्याने दाखवलेला संयम त्याच्यातील टॅलेंट सिद्ध करतो. अशा युवा खेळाडूंवर संघाने विश्वास दाखवणे गरजेचे आहे,” असे पीटरसनने नमूद केले.


























































