
IPL 2026 मधील आपल्या मोहिमेची सुरुवात करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सला पहिल्याच सामन्यात मोठा झटका बसला आहे. लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या इकाना स्टेडियमवरील सामन्यात संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क खेळत नाहीये. तब्बल 11.75 कोटी रुपयांना खरेदी केलेला स्टार्क संघाचा मुख्य गोलंदाज असल्याने, त्याच्या अनुपस्थितीमुळे दिल्लीच्या गोटात आणि चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
मिचेल स्टार्कने स्वतः आपल्या गैरहजेरीचे कारण स्पष्ट करताना सांगितले की, तो सध्या खांदा आणि कोपरच्या दुखापतीशी झुंज देत असून रिहॅब प्रक्रियेतून जात आहे. त्याच्या कमिटमेंटवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या टीकाकारांना उत्तर देताना तो म्हणाला की, “काही लोक माझ्या शरीराबद्दल माझ्यापेक्षा जास्त जाणून असल्यासारखे बोलत आहेत, जे चुकीचे आहे.” स्टार्कने या कठीण काळात दिल्ली कॅपिटल्स व्यवस्थापन आणि चाहत्यांची माफी मागितली असून, लवकरात लवकर मैदानात परतण्यासाठी तो प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट केले आहे.
स्टार्कच्या अनुपस्थितीमुळे दिल्लीच्या गोलंदाजीचे समीकरण पूर्णपणे बदलले आहे. त्यातच क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वर्कलोड मॅनेजमेंटच्या कारणास्तव त्याला ‘एनओसी’ (NOC) देण्यास उशीर केल्याच्या बातम्याही समोर येत आहेत. गेल्या हंगामात पाचव्या स्थानावर राहिलेल्या दिल्लीला यंदा प्लेऑफमध्ये धडक मारायची आहे, मात्र स्टार्कसारख्या अनुभवी खेळाडूचे सुरुवातीच्या सामन्यांना मुकणे हा संघासाठी मोठा अडथळा मानला जात आहे. आता तो कधीपर्यंत तंदुरुस्त होऊन संघात परततो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


























































