IPL 2026 – ‘5000 रुपये लावून बघा, बुडतील की काय या भीतीने हृदय धडधडतं’; लखनऊच्या मालकाच्या समर्थनार्थ मोहम्मद शमी मैदानात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

IPL 2026 च्या हंगामापूर्वी लखनऊ सुपर जायंट्सचा (LSG) नवा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने फ्रँचायझी मालक संजीव गोयंका यांची पाठराखण केली आहे. गोयंका यांच्या मैदानातील आक्रमक प्रतिक्रियेमुळे अनेकदा त्यांच्यावर टीका झाली असली तरी, शमीने त्यांचे समर्थन केले आहे. जेव्हा एखादी व्यक्ती संघात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करते, तेव्हा त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा असणे सहाजिकच आहे, असे स्पष्ट मत शमीने एका पॉडकास्टमध्ये व्यक्त केले.

संजीव गोयंका यांच्या स्वभावाचे समर्थन करताना शमीने एक चपखल उदाहरण दिले. तो म्हणाला की, “एखाद्या सामान्य माणसाने साधे 5,000 रुपये जरी कुठे गुंतवले, तरी ते बुडतील की काय या भीतीने त्याचे हृदय धडधडते. इथे तर गोयंका यांनी हजारो कोटी रुपये खर्च केले आहेत. अशा परिस्थितीत जर ते आपल्या खेळाडूंकडून सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा करत असतील किंवा संघाबद्दल हळवे असतील, तर त्यात काहीही गैर नाही.” असं तो म्हणाला.

IPL 2026 – 11.75 कोटी रुपयांचा मिचेल स्टार्क DC Vs LSG या पहिल्याच सामन्यात बाहेर का?

यावेळी शमीने सोशल मीडियावर गोयंका यांच्याबद्दल बनणाऱ्या मीम्सवरही नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला की, गोयंका यांच्याशी झालेली त्याची आतापर्यंतची चर्चा अतिशय तर्कसंगत आणि संघाच्या हिताची राहिली आहे. आगामी आयपीएल हंगामात लखनऊच्या वेगवान गोलंदाजीची धुरा मोहम्मद शमीच्या खांद्यावर असणार असून, मयंक यादव आणि मोहसिन खान यांसारख्या युवा गोलंदाजांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारीही त्याच्यावर असेल.