IPL 2026 सूरू होण्यापूर्वी KKR ची मोठी खेळी, रिंकू सिंहच्या खांद्यावर सोपवली मोठी जबाबदारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

IPL 2026 च्या हंगामापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) आपल्या नेतृत्वात मोठा बदल करत स्फोटक फलंदाज रिंकू सिंहची उपकर्णधारपदी नियुक्ती केली आहे. मंगळवारी आयोजित ‘Knights Unplugged’ या कार्यक्रमात कर्णधार अजिंक्य रहाणेचा उपकर्णधार म्हणून रिंकूच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. केकेआरने सोशल मीडियावर ‘गॉड प्लॅनचा नवा अध्याय’ अशा कॅप्शनसह ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली.

केकेआरचे मुख्य प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी या निर्णयाचे स्वागत करताना रिंकूच्या प्रवासाचे कौतुक केले. नायर म्हणाले की, “रिंकू जेव्हापासून केकेआरमध्ये आला आहे, तेव्हापासून मी त्याच्यासोबत काम करत आहे. आज त्याला या महत्त्वाच्या पदावर पाहणे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. गेल्या काही वर्षांत तो केवळ एक उत्कृष्ट खेळाडूच नाही, तर एक सक्षम माणूस म्हणूनही समोर आला आहे. मैदानातील खेळासोबतच मैदानाबाहेरही संघ त्याच्याकडे एक विश्वासार्ह खेळाडू म्हणून पाहतो.” या जबाबदारीमुळे रिंकूच्या कामगिरीत अधिक प्रगल्भता येईल, असा विश्वास प्रशिक्षकांनी व्यक्त केला आहे.

रिंकू सिंहने आतापर्यंत केकेआरसाठी 59 सामन्यांत 30 च्या सरासरीने 1099 धावा केल्या आहेत. 2023 मध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध शेवटच्या षटकात सलग 5 षटकार ठोकून त्याने अशक्य वाटणारा विजय मिळवून दिला होता, ज्यामुळे तो रातोरात जागतिक सुपरस्टार बनला. आतापर्यंत ‘फिनिशर’ची भूमिका बजावणारा रिंकू या हंगामात चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची शक्यता आहे.