IPL 2020 – नवा चॅम्पियन की पाचव्यांदा विजेतेपद? मुंबई इंडियन्स-दिल्ली कॅपिटल्समध्ये आज फायनल जंग

आयपीएलच्या तेराव्या मोसमातील जेतेपदाचा फैसला उद्या दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये अजिंक्यपदाची लढाई रंगणार आहे. मुंबई इंडियन्सने 2013, 2015, 2017 व 2019 साली ही स्पर्धा जिंकण्याची करामत करून दाखवलीय. यावेळी एकीकडे रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सचा संघ पाचव्यांदा चॅम्पियन होण्यासाठी सर्वस्व पणाला लावताना दिसेल, तर दुसरीकडे मुंबईकर श्रेयस अय्यरचा दिल्ली कॅपिटल्सचा संघ पहिल्यांदाच आयपीएल चॅम्पियन होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करील. दिल्ली कॅपिटल्सने ही स्पर्धा एकदाही जिंकलेली नाही. बघूया उद्या आयपीएलला दिल्ली कॅपिटल्सच्या रूपात नवा चॅम्पियन मिळतोय की मुंबई इंडियन्स पाचव्यांदा अजिंक्य ठरतोय ते…

रोहित ब्रिगेडचे पारडे जड

मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये आतापर्यंत 27 लढती झाल्या आहेत. मुंबई इंडियन्सने 15 लढती जिंकून आपले वर्चस्व दाखवून दिले आहे. दिल्ली कॅपिटल्सने 12 लढती जिंकल्या आहेत. मागील पाच लढतींपैकी चार लढतींमध्ये मुंबई इंडियन्सने बाजी मारली आहे. त्यामुळे उद्याच्या फायनल लढतीआधी मुंबई इंडियन्सचे पारडे जड असेल, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

यंदाच्या मोसमात तिन्ही लढतींत पराभव

मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये आयपीएलच्या यंदाच्या मोसमात तीन लढती पार पडल्या आहेत. 11 ऑक्टोबरला झालेल्या लढतीत मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला पाच गडी राखून पराभूत केले. त्यानंतर 31 ऑक्टोबरला झालेल्या लढतीत मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 9 गडी राखून धुव्वा उडवला. त्यानंतर 5 नोव्हेंबर रोजी खेळवण्यात आलेल्या क्वॉलिफायर वनच्या लढतीत मुंबई इंडियन्सने 57 धावांनी विजय मिळवून अगदी रुबाबात अंतिम फेरीत धडक मारली. दिल्ली कॅपिटल्सला या मोसमात मुंबई इंडियन्सविरुद्ध तिन्ही लढतींत पराभव पत्करावा लागला आहे.

या खेळाडूंमधील द्वंद्व ठरणार लक्षणीय

  • रोहित शर्मा – पॅगिसो रबाडा
  • सूर्यपुमार यादव – अॅनरीक नॉर्खिया
  • कायरॉन पोलार्ड – रवी अश्विन
  • शिखर धवन – जसप्रीत बुमराह
  • मार्पस स्टोयनीस – ट्रेण्ट बोल्ट

आजची फायनल लढत – मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स ( दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, दुबई, रात्री 7.30 वाजता)

आपली प्रतिक्रिया द्या