
गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज व गतउपविजेता कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील लढतीने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर शनिवारी आयपीएलच्या 15व्या हंगामास प्रारंभ झाला. मात्र, आयपीएलच्या इतिहासात सलग चौथा हंगाम उद्घाटन सोहळ्याशिवाय सुरू झाला हे विशेष!
आयपीएलचा अखेरचा उद्घाटन सोहळा याआधी 2018मध्ये रंगला होता. मात्र, 2019मध्ये पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. त्यामुळे बीसीसीआयने त्यावेळी आयपीएलचा उद्घाटन सोहळा रद्द केला होता. त्यानंतर 2020मध्ये कोरोनाच्या संकटामुळे आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यास छेद देण्यात आला.
या वेळी देखील बायो-बबलच्या कडक नियमांमुळे उद्घाटन सोहळ्याशिवाय आयपीएलच्या 15व्या हंगामास सुरुवात झाली असे वृत्त आहे. आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यावर ‘बीसीसीआय’ला जवळपास 30 कोटी रुपये खर्च येतो. या उद्घाटन सोहळ्यापासून ‘बीसीसीआय’ला फारसा फायदाही होत नाही. त्यामुळे हा 30 कोटींचा चुराडा टाळण्यासाठी ‘बीसीसीआय’ने यंदा आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्याला फाटा दिला, अशीही चर्चा आहे.
चेन्नईला सलामीलाच कोलकाताकडून पराभवाचा धक्का
गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या 15व्या हंगामातील उद्घाटनाच्या लढतीत पराभव पत्करावा लागला. या लढतीत कोलकाता नाईट रायडर्सने 6 गडी आणि 9 चेंडू राखून बाजी मारत उद्घाटनाच्या लढतीतील विजयाचे आणखी एक पान वाढविले. चेन्नईने 13 उद्घाटनाच्या लढतीत सातवा पराभव पाहिला, तर कोलकात्याने 15 पैकी 11 उद्घाटनाच्या लढती जिंकण्याचा पराक्रम केला. चेन्नईकडून मिळालेले 132 धावांचे माफक लक्ष्य कोलकात्याने 18.3 षटकांत 4 बाद 133 धावा करून पूर्ण केले.
बुढ्ढा होगा तेरा बाप!
वयाची चाळिशी ओलांडलेल्या महेंद्रसिंग धोनीने चेन्नई संघाचे सेनापतीपद सोडल्यानंतरही आयपीएलच्या 15व्या हंगामात सुरुवातीच्या पडझडीनंतर दणकेबाज नाबाद अर्धशतक ठोकले. धोनीच्या अर्धशतकी खेळीसह 36 वर्षीय रॉबिन उथप्पाच्या आक्रमक 28 धावांच्या जोरावर चेन्नईला 5 बाद 131 धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. धोनीच्या खेळीला उपस्थितांनी उत्स्फूर्त अशी दाद दिली.























































