केकेआरमध्ये संवादाचा मोठा अभाव! कुलदीप यादवचा संघ व्यवस्थापनावर आरोप

हिंदुस्थानचा ‘चायनामन’ गोलंदाज कुलदीप यादवने आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून (केकेआर) अंतिम 11 मध्ये संधी न मिळाल्याबद्दल संघ व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले आहेत. ‘संघात संवादाचा मोठा अभाव आहे. खेळाडूला खेळण्याची संधी का मिळत नाही किंवा त्याच्यामध्ये कोणत्या सुधारणा अपेक्षित आहेत याबाबत काहीच सांगितले जात नाही,’ असे त्याने म्हटले आहे.

माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राच्या ‘यू टय़ूब’ चॅनेलवरील मुलाखतीदरम्यान कुलदीप यादव म्हणाला, ‘खेळाडूला संघामधून का वगळण्यात आले आहे हेदेखील त्याला माहीत नसते. प्रशिक्षक आणि खेळाडू यांच्यातील संवाद कमकुवत होतो तेव्हा अनेक समस्या निर्माण होत असतात. तुम्ही खेळत आहात का किंवा संघ तुमच्याकडून काय अपेक्षा करतो हे तुम्हाला माहीत नसते. आपण संघाला जिंकून देऊ शकतो, असा विश्वास असणाऱया खेळाडूला का वगळण्यात आले याचे कारण शेवटपर्यंत कळतच नाही. संघ व्यवस्थापन फक्त दोन महिन्यांसाठी योजना बनवते. यामुळे अडचणी वाढतात,’ असे परखड मत कुलदीप यादवने व्यक्त केले.

आपली प्रतिक्रिया द्या