IPL राजस्थान-दिल्ली यंदा प्रथमच भिडणार

सामना प्रतिनिधी ।  जयपूर

यंदाच्या आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत बरेच संघ दोन वेळा आमने सामने आले. मात्र 39 लढती झाल्या तरी राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल हे दोन संघ एकदाही आमने सामने आले नाहीत. उद्या, 22 एप्रिलला हे उभय संघ यंदा प्रथमच जयपूरमध्ये भिडणार आहेत.

कर्णधार स्टीव्हन स्मिथच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सला धूळ चारून तिसर्‍या विजयाला गवसणी घातली. दुसरीकडे किंग्ज इलेव्हन पंजाबला हरविलेल्या दिल्ली कॅपिटलपुढे राजस्थानला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करण्याचे आव्हान असेल. राजस्थानकडे अजिंक्य रहाणे, संजू सॅमसन, स्टीव्हन स्मिथ, बेन स्टोक्स, रियान पराग, ऍस्टोन टर्नर व स्टुअर्ट बिन्नी असा खोलवर फलंदाजी क्रम आहे. दिल्लीकडेही पृथ्वी शॉ, शिखर धवन, कॉलिन मुन्रो, श्रेयस अय्यर, रिषभ पंत असे हवाई हल्ले चढविणारे फलंदाज आहेत. गोलंदाजीमध्ये कॅगिसो रबाडा व इशांत शर्मा या वेगवान जोडगोळीवर दिल्लीची मदार असेल. ख्रिस मॉरिस, किमो पौल, अमित मिश्रा व अक्षर पटेल असे गोलंदाजही त्यांच्या मदतीला आहेत. राजस्थानकडे जोफ्रा अर्चर, स्टुअर्ट बिन्नी, धवल कुलकर्णी, श्रेयस गोपाल, जयदेव उनाडकट व रियान पराग असा वैविध्यपूर्ण गोलंदाजी ताफा आहे.

दिल्लीने 10 लढतींत 6 विजयांसह 4 पराभव पाहिले असून ‘आयपीएल’च्या गुणतालिकेत हा संघ 12 गुणांसह तिसर्‍या स्थानी आहे. राजस्थानला 9 पैकी 6 लढतींत पराभवाचे तोंड पाहावे लागले, तर 3 लढती त्यांनी जिंकल्या आहेत. हा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानी आहे. मात्र तरीही या घडीला कागदावर दोन्ही संघ तुल्यबळ वाटतात. बघूया यात उद्या कोण बाजी मारतो ते?