IPL अर्ध्या वरती डाव मोडला… पहा कोणकोणत्या टीम मध्ये कोरोनाचा स्फोट?

कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा फटका BCCI ला देखील बसला आहे. IPL चा 14 वा सीझन अर्ध्यातच सोडून द्यावा लागला आहे. IPL चे पुढले सर्व सामने अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा तडकाफडकी करण्यात आली आहे. अर्थात सध्या जरी पुढील सामने स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला असला तरी देखील या वर्षात पुढे कधी खेळवले जाणार नाही असे नाही. पण त्यासंदर्भात अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

कोरोनाचं संकंट असताना देखील आयपीएलचे सामने हिंदुस्थानात खेळवण्याचा निर्णय यंदा घेण्यात आला होता. सुरुवातीला बायो बबल तयार करण्यात आला, ज्यामध्ये दावा करण्यात आला होता की या बायो बबलमुळे कोरोनाचा धोका निर्माण होणार नाही. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये आयपीएलच्या अनेक संघ कोरोनाचे शिकार होऊ लागले. आकडा वाढल्याचं लक्षात येताच बीसीसीआने तातडीने पुढील सामने स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

KKR ला पहिला फटका

सगळ्यात आधी कोलकाता नाइट रायडर्सच्या वरुण चक्रवर्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त आले. त्यासोबतच याच संघातील आणखी दोन खेळाडू पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. त्यानंतर लगेच बंगळुरू सोबतचा त्यांचा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. KKR च्या सामन्यानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या पूर्ण संघाला क्वारंटाइन करण्यात आले.

CSK मध्येही तीन जणांना लागण

त्यानंतर चेन्नई सुपर किंग्सच्या तीन सदस्यांना कोरोनाने ग्रासल्याचं समोर आलं. ज्यामध्ये गोलंदाज प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी देखील सहभागी करण्यात आला होता. त्यामुळे आणखी एका सामन्यावर प्रश्नचिन्ह लागलं.

सनराइजर्स हैदराबादही अडचणीत

आता मंगळवारी सनराइजर्स हैदराबादच्या ऋद्धिमान साहाचा रिपोर्ट देखील पॉझिटिव्ह आला. त्यामुळे मंगळवारी सामना घेणं अवघड झालं. तसंच दिल्लीच्या स्टेडियमचा काही स्टाफ देखील कोरोना पॉझिटिव्ह आला. अमित मिश्राचा रिपोर्ट आल्यावर आणखी एक फटका बसला कारण तो देखील पॉझिटिव्ह आला. त्यामुळे आयपीएलच्या खेळाडूंवर संकट गडद होताना दिसलं आणि अखेर पुढले सामने रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोरोनाचे संकट घोंगावत असताना देखील 9 एप्रिल रोजी आयपीएलला सुरुवात झाली. अजून आयपीएलचे 31 सामने खेळवणे बाकी होते. मात्र वाढतं कोरोना संकट लक्षात घेत पुढील सामने रद्द करण्यात आले. कदाचित आयपीएलचे उर्वरित सामने T-20 वर्ल्डकपनंतर खेळवण्यात येतील, अशी ही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आयपीएल होणार का? असा संशय अनेकांना होता. बरेच खेळाडू मध्येच बायो बबल सोडून बाहेर पडले होते. यामध्ये आर अश्विन हे मोठं नाव होतं. त्याच्यासोबत ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडचे काही खेळाडूही बाहेर पडले. राजस्थान रॉयल्सचे बरेच परदेशी खेळाडू घरी परतले होते.

आपली प्रतिक्रिया द्या