IPL 2020 – फर्ग्युसनने गाजवला दिवस, हैदराबादचा सहावा पराभव

वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील पहिल्याच लढतीत धडाकेबाज कामगिरी केली. त्याने केलेल्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने शनिवारी झालेल्या लढतीत सनरायझर्स हैदराबादवर सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. कोलकाता नाईट रायडर्सचा हा पाचवा विजय ठरला. त्यामुळे ओएन मॉर्गनच्या संघाला दहा गुणांची कमाई करता आली. लॉकी फर्ग्युसनने निर्धारित सामन्यांमध्ये 15 धावा देत तीन फलंदाजांना बाद केले. तसेच सुपर ओव्हरमध्ये अवघ्या 2 धावांमध्ये दोन फलंदाज बाद करीत कोलकाता नाईट रायडर्सला दिमाखदार विजय मिळवून दिला. कोलकाता नाईट रायडर्सच्या दिनेश कार्तिक व ओएन मॉर्गन या जोडीने सुपर ओव्हरमधील तीन धावांचे आव्हान चौथ्या चेंडूवर पूर्ण केले.

दुखापतीमुळे विल्यमसन सलामीला

केन विल्यमसनच्या पायाला दुखापत झाली होती. अशा परिस्थितीत मधल्या फळीत येऊन एकेरी-दुहेरी धावा काढताना अडचण निर्माण होऊ शकते हे लक्षात घेऊन सनरायझर्स हैदराबादने केन विल्यमसनला सलामीला पाठवले. कर्णधार डेव्हिड वॉर्नरने मधल्या फळीत फलंदाजीला येणे पसंत केले. कोलकाता नाईट रायडर्सकडून मिळालेल्या 164 धावांचा पाठलाग करताना जॉनी बेअरस्टो (36 धावा), केन विल्यमसन (29 धावा) यांनी 58 धावांची भागीदारी करीत आश्वासक सुरुवात करून दिली.

मालवणी तडका (हैदराबाद-कोलकाता लढत)

कोलकात्यान पयली बॅटिंग करून जेमतेम 163 जमयले… हैदराबादने सहज जिंकाचो सामना… तरी तो सुपरओव्हरपर्यांत गेलो… आणि थयसर जावन कोलकात्यान बाजी मारली… रविवारचो सामनो हैदराबादसाठी बादल चौधरीच्या शब्दांत – ‘ताटात इला पन मुखाक नाय लागला…’

न्यूझीलंडचा गोलंदाज चमकला

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन याचा पहिलाच सामना होता. त्याने केन विल्यमसनला नितीश राणाकरवी झेलबाद करीत सनरायझर्स हैदराबादला पहिला धक्का दिला. त्यानंतर प्रियम गर्ग (4 धावा) व मनीष पांडे (6 धावा) यांचा त्रिफळा उद्ध्वस्त केला. वरुण चक्रवर्तीने जॉनी बेअरस्टोला बाद केले. संघ संकटात असताना डेव्हिड वॉर्नर (नाबाद 47 धावा) व अब्दुल समद (23 धावा) यांनी सनरायझर्स हैदराबादच्या विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण आंद्रे रस्सेलच्या अखेरच्या षटकात विजयासाठी 18 धावांची आवश्यकता असताना 17 धावा करण्यात त्यांना यश लाभले. अखेर लढत बरोबरीत राहिली आणि निकालासाठी सुपर ओव्हरचा अवलंब करण्यात आला. दरम्यान, याआधी शुभमन गिल (36), ओएन मॉर्गन (34), दिनेश कार्तिक (नाबाद 29) यांच्या दमदार फलंदाजीमुळे कोलकाता नाईट रायडर्सला 163 धावा करता आल्या.

आपली प्रतिक्रिया द्या