इक्बाल मिर्ची खटल्यात कपिल वाधवानला सशर्त जामीन

304

गँगस्टर इक्बाल मिर्ची याच्याशी आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप असलेला दिवान हाऊसिंग फायनान्स (डीएचएफएल) कंपनीचा अध्यक्ष कपिल वाधवान याला आज विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला. वाधवान याला परदेशात जाण्यास न्यायालयाने मनाई केली असून त्याचा पासपोर्ट जप्त करण्याचे आदेशही दिले आहेत. कपिल वाधवान याला मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गेल्या 27 जानेवारी रोजी अटक केली होती.

विशेष न्यायालयाने वाधवान याचा जामीन मंजूर करताना ईडी बोलवेल तेव्हा त्यांच्या कार्यालयात हजर राहावे, असा आदेशही दिला. त्याचप्रमाणे या खटल्यातील साक्षीदारांशी संपर्क साधू नये किंवा कोणतेही पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करू नये, असेही न्यायालयाने बजावले. वाधवान याला विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर ईडीने तासाभरातच मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन विशेष न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती द्यावी, अशी विनंती केली. पण वाधवान याची तुरुंगातून सुटका करण्यात आल्याने ईडीला ती याचिका मागे घ्यावी लागली.

आपली प्रतिक्रिया द्या