पालिका आयुक्त `ऑन फिल्ड’! विविध भागांत भेटी देऊन आढावा

मुंबईत अतिवृष्टी होत असताना पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी मुंबईच्या विविध भागांत प्रत्यक्ष भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्या त्या ठिकाणच्या परिस्थितीनुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देत नियंत्रण ठेवले. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सोबतही त्यांनी पाहणी केली.

मुंबईत मंगळवारी रात्री 8 ते आज बुधवारी सकाळी 8 वाजेपर्यंत म्हणजे 12 तासात शहर भागात 256 मिमी, पश्चिम उपनगरांमध्ये 237 मिमी तर पूर्व उपनगरांमध्ये 158 मिमी पावसाची नोंद झाली आहे. काही ठकिाणी तर प्रतितास 70 मिमी या तीव्रतेने पाऊस कोसळला. यानुसार 12 तासांतील एकूण अतिवृष्टीचा परिणाम म्हणून सखल भागात पाणी साचल्याचे आयुक्त चहल यांनी सांगितले. सुुरुवातीला आयुक्त चहल यांनी शहर भागात वरळी सी फेस व त्यानंतर पश्चिम उपनगरात मिलन सब वे, खार सब वे येथे पाहणी केली. साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी उदंचन (पंिंपग) यंत्रणा पूर्ण क्षमतेने व अव्याहतपणे सुरु ठेवावी, जोरदार पावसाची संभाव्यता लक्षात घेता आवश्यक तेथे तात्पुरत्या निवाNयांचीही व्यवस्था करावी, असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. येत्या 24 तासात जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेता यंत्रणेला सतर्वâ व सुसज्ज राहण्याचे निर्देशही त्यांनी दिले. याप्रसंगी अतिरक्ति महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी, उपआयुक्त (आपत्कालीन व्यवस्थापन) प्रभात रहांगदळे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, उपआयुक्त (पायाभूत सुविधा) संजय दराडे यांच्यासह संबंधित परिमंडळांचे उपआयुक्त, विभागांचे सहाय्यक आयुक्त आणि इतर अधिकारी देखील उपस्थित होते. दरम्यान, पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह वांद्रे-धारावी रस्ता व ड्राइव्ह इन थिएटर लगतच्या परिसराची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी वरळी पोलीस वसाहतीलगतच्या परिसरात आज सकाळी खचलेल्या संरक्षक भिंतीची पाहणी केली. तसेच त्यानंतर सिद्धार्थ नगरामध्ये 2 दिवसांपूर्वी खचलेल्या छोट्या टेकडीच्या भागाचीही पाहणी केली.

26 वर्षांचा विक्रमी सप्टेंबर
– मुंबईत मंगळवारी सकाळी 8.30 ते बुधवारी सकाळी 8.30 पर्यंत सांताक्रूझ वेधशाळा – 286.4 मिमी तर कुलाबा वेधशाळेकडून 147.8 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. मुंबईत 1994 मध्ये असा मुसळधार पाऊस पडला होता. र्
– हवामान खात्याकडून दिलेल्या माहितीनुसार 24 तासांत 64.5 मिमी पाऊस पडला तर अतिवृष्टी म्हणून जाहीर केले जाते. हे प्रमाण पाहता मुंबईत कालपासून सुरू असलेल्या पावसाच्या प्रमाणावरून तीव्रता समोर येते.

हायकोर्टाचे कामकाज तहकूब
जोरदार पावसाचा परिणाम आज मुंबई उच्च न्यायालयाच्या कामकाजावर झाला. हायकोर्टात कर्मचारी पोहोचू न शकल्याने मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांनी आज सुट्टी जाहीर केली. तशी नोटीस प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुळे हायकोर्टातील सर्व प्रकरणावर उद्या गुरुवारी सुनावणी होणार आहे. आज रिया चक्रवर्ती हिचा जामीन अर्ज आणि कंगना राणावत हिच्या याचिकेवर सुनावणी होती. ती आता गुरुवारी होणार आहे.

ताडदेवमध्ये दरड कोसळली
ताडदेव येथे नवीन जायफळवाडी, एसआरए इमारतीसमोर, ताडदेव पोलीस ठाण्याच्या मागे आज दरडीचा काही भाग कोसळला. मात्र, सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. संबंधित विभागाकडून मदतकार्य सुरू आहे.

मिठीजवळील रहिवाशांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर
गेल्या 24 तासांत सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे मिठी नदीच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्या पाश्र्वभूमीवर, कुर्ला येथे मिठी नदीला लागून असलेल्या क्रांतीनगर परिसरातील 50 रहिवाशांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले. पावसाची जोर कमी झाल्यावर मिठी नदीची पाणी पातळी कमी झाली. त्यानंतर हे सर्व जण घरी परतले, अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाने दिली.

– मुंबईत 2, पूर्व उपनगरात 2 तर पश्चिम उपनगरात 4 अशा एकूण 8 ठिकाणी घर आणि भिंत पडण्याच्या घटना घडल्या. मात्र, यात कोणीही जखमी झाले नाही.
– मुंबईत 2, पूर्व उपनगरात 9 तर पश्चिम उपनगरात 1 ठिकाणी झाडे आणि फांद्या पडल्याच्या घटना घडल्या. झाडे आणि फांद्या हटविण्याचे काम सुरू आहे. मात्र, या घटनांमध्ये कोणीही जखमी झाले नाही.

– मुंबईत गेल्या 24 तासांत 40 ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. यात मुंबईत 18 ठिकाणी, पूर्व उपनगरात 4 ठिकाणी तर पश्चिम उपनगरात 18 ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. वीजपुरवठा यंत्रणेकडून मदतकार्य सुरू आहे. या सर्व घटनांमध्ये कोणीही जखमी झालेले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या