
अणुकार्यक्रमाच्या मुद्दय़ावर इराणशी चर्चा सुरू असतानाच अमेरिकेने मध्य आशियात लष्करी जमवाजमव सुरू केल्यामुळे इराणही सावध झाला आहे. पूर्वतयारी म्हणून इराणने संपूर्ण देशात ‘नोटम’ (नोटीस टू एअर मिशन्स) लागू केला आहे. त्यामुळे इराणचे आकाश आता नो फ्लाय झाले आहे.
इराणला अण्वस्त्र संपन्न होण्यापासून रोखण्याचा अमेरिकेचा एककलमी अजेंडा आहे. त्यासाठी इराणवर वेगवेगळय़ा मार्गांनी दबाव आणला जात आहे. इराणमधील सरकारविरोधी आंदोलनालाही अमेरिकेने रसद पुरवल्याचे बोलले जाते. तसेच, नुकतीच अमेरिकेने 50 लढाऊ विमाने इराणच्या दिशेने रवाना केली आहेत. त्या पार्श्वभूमीवर इराणने प्रतिहल्ल्याची तयारी सुरू केली आहे. रॉकेटच्या चाचणीसाठी ‘नोटम’ लागू केल्याचे इराणने सांगितले असले तरी हा अमेरिकेच्या संभाव्य हवाई हल्ल्यापासून बचावाचा भाग मानला जात आहे.


























































