इराणमध्ये एका अफवेने घेतले 300 बळी, कोरोनावर उपचार म्हणून….

2609

कोरोना व्हायरस जगातील 199 देशांमध्ये पसरला आहे. चीन नंतर इटली, अमेरिका, स्पेन आणि इराण या देशात या व्हायरसने हाहाकार उडाला आहे. या देशात महामारीमुळे हजारो लोकांना जीव गमवावा लागला असून लाखो लोकांना याची लागण झाली आहे. जगातील एकही देशाला अद्याप या रोगावर लस तयार करता आलेली नाही. यामुळे अफवांचे पीकही जोमाने वाढत आहे. आपल्याकडे उन्हात बसल्याने, दारू प्यायला तर कोरोना होत नाही अशी अफवा पसरली होती. अशीच एक अफवा इराणमध्ये पसरली आणि यात 300 लोकांचा जीव गेला असून शेकडो लोक रुग्णालयात दाखल आहेत.

इराणमध्ये 2300 पेक्षा जास्त लोकांचा कोरोना रोगामुळे मृत्यू झाला आहे. एकीकडे रुग्णांचा आकडा वाढत असताना अफवाही पसरत आहे. शुक्रवारी इराणमध्ये मिथेनॉल प्यायल्याने कोरोना बरा होतो किंवा होत नाही अशी अफवा पसरली. ही अफवा सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाली. यावर वेड्यासारखा विश्वास ठेवत जवळपास शेकडो लोकांनी मिथेनॉल प्यायले. यामुळे 300 लोकांना जीव गमवावा लागला, तर 1000 लोकांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यांची स्थिती सध्या गंभीर आहे, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

मिथेनॉल वजनाला हलके, रंगहीन आणि ज्वलनशील पदार्थ आहे. याचा वास इथेनॉल (अल्कोहोल) सारखा आहे. परंतु हे विषारी द्रव्य आहे. हे प्यायल्याने माणसाचा मृत्यू ओढवू शकतो, आणि मृत्यूपूर्वी आंधळा देखील होऊ शकतो.

स्थानिक प्रसार माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, इराणमध्ये पारशी भाषेत एक संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात लिहिण्यात आले होते की, एका वृत्तपत्राच्या दाव्यानुसार ब्रिटनमध्ये लोकांनी व्हिस्की आणि मध प्यायला आणि कोरोनापासून मुक्ती मिळवली. त्यामुळे अल्कोहोल प्या. अल्कोहोल शरिरातील व्हायरसचा खात्मा करतो. विशेष म्हणजे इराणमध्ये अल्कोहोल पिण्यावर बंदी आहे. तरीही लोकांनी या अफवेवर विश्वास ठेवत मिथेनॉल प्यायले आणि जीव गमावला.

इराणमध्ये कोरोनाचा कहर
दरम्यान इराणमध्ये कोरोनामुळे 2300 लोकांचा मृत्यू झाला असून 32 हजार लोकांना याची लागण झाली आहे. यातील 11 हजार लोक उपचारानंतर बरे झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या