Iran-Israel War – आखाती देशांतील तणावाचा परिणाम; Air India च्या तिकिटांवर इंधन अधिभार, प्रवाशांना भुर्दंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली असून त्याचा परिणाम विमान उद्योगावरही दिसू लागला आहे. त्यामुळे Air India ने इंधन अधिभार वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाने मंगळवारी (10 मार्च 2026) अधिकृत निवेदन जारी करत सांगितले की ही वाढ टप्प्याटप्प्याने लागू केली जाणार असून ती देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय सर्व मार्गांवर लागू असेल. यामध्ये Air India Express द्वारे चालविल्या जाणाऱ्या उड्डाणांचाही समावेश आहे.

कंपनीच्या माहितीनुसार मार्च 2026 च्या सुरुवातीपासून एव्हिएशन टर्बाइन फ्युएल च्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. विमान कंपन्यांच्या एकूण खर्चातील सुमारे 40 टक्के खर्च इंधनावर होत असल्याने या वाढीचा थेट परिणाम ऑपरेशनवर होत आहे. हिंदुस्थानात दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये ATF वर आकारला जाणारा जास्त एक्साइज ड्युटी आणि व्हॅट यामुळे हा दबाव आणखी वाढत असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.

पहिला टप्पा 12 मार्च 2026 पासून लागू होणार असून देशांतर्गत तसेच सार्क देशांसाठीच्या प्रवासावर 399 रुपयांचा इंधन अधिभार लागू होईल. आखाती देशांसाठी 10 डॉलर, आग्नेय आशियासाठी 60 डॉलर (पूर्वी 40) आणि आफ्रिकेसाठी 90 डॉलर (पूर्वी 60) अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे. दुसरा टप्पा 18 मार्चपासून लागू होणार असून युरोपसाठी 125 डॉलर (पूर्वी 100) आणि ऑस्ट्रेलिया व उत्तर अमेरिकेसाठी 200 डॉलर (पूर्वी 150) अधिभार लागू होईल. मात्र आधीच बुकिंग केलेल्या तिकिटांवर हा नवीन अधिभार लागू होणार नाही, असेही एअर इंडियाने स्पष्ट केले आहे.