Iran US Israel War – आखातात युद्धाचा भडका; अमेरिकेचे C-130 विमान आणि दोन ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्स पाडल्याचा इराणचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य पूर्वेतील तणाव आता टोकाला पोहोचला असून इराणने अमेरिकेचे C-130 मालवाहू विमान पाडल्याचा खळबळजनक दावा केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेला 48 तासांचा अल्टिमेटम संपुष्टात येत असतानाच ही घटना घडली आहे. तसेच अमेरिकन पायलटचे रेस्क्यू करताना मोठी धुमश्चक्री उडाली आणि पाच जण ठार झाल्याचा दावाही इराणने केला आहे. दुसरीकडे इराणने C-130 विमान पाडल्याचा दावा अमेरिकेने फेटाळून लावला आहे. ‘द टाइम्स ऑफ इस्रायल‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

एफ-15 विमान पाडल्यानंतर बेपत्ता झालेल्या पायलटचा शोध घेण्यासाठी अमेरिकेने युद्धपातळीवर मोहीम सुरू केली होती. या मोहिमेसाठी एक डझनहून अधिक विमाने पाठवण्यात आल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. याच शोध मोहिमेदरम्यान इराणने अमेरिकेचे C-130 विमान आणि काही उडणाऱ्या गोष्टी पाडल्याचा दावा केला आहे.

पायलटला शोधण्यासाठी अमेरिकेने राबवलेल्या मोहिमेदरम्यान झालेल्या हल्ल्यात पाच जण ठार झाल्याचेही इराणने म्हटले. तसेच या मोहिमेदरम्यान अमेरिकेची अनेक विमाने नष्ट करण्यात आल्याचा दावा इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने केला आहे. ‘तसनीम’ या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.

आम्हाला हरवण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी हे युद्ध दलदल ठरेल; इराणकडून अमेरिका-इस्रायलला ‘नरक’ यातनांचा इशारा

इराणच्या पोलीस विभागाने इस्फाहानच्या दक्षिणेस अमेरिकेचे एक C-130 विमान पाडल्याचा दावा केला आहे. संयुक्त कारवाईदरम्यान शत्रूची विमाने नष्ट करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. पाडलेल्या विमानांमध्ये C-130 लष्करी मालवाहतूक विमान आणि दोन ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्सचा समावेश असल्याचे इराणी सशस्त्र दलांचे संयुक्त मुख्यालय असलेल्या ‘खातम अल-अंबिया’च्या प्रवक्त्याने सांगितले. तसेच याच प्रांतात रविवारी इस्रायलचे एक ड्रोन पाडल्याचा दावाही त्यांनी केला.

आम्ही त्याला परत आणलं! अमेरिकेच्या F15 लढाऊ विमानाच्या वैमानिकाची सुटका, इराणच्या हद्दीतून केलं रेस्क्यू

दरम्यान, अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांना इराण जोरदार प्रत्युत्तर देत असून आखातातील अमेरिकन तळांना लक्ष्य केले जात आहे. अबू धाबीतील बोरोज पेट्रोकेमिकल फॅक्टरीवर ड्रोनचे अवशेष पडल्याने मोठी आग लागली आहे. तर संयुक्त अरब अमिरातीने काही ड्रोन हवेतच नष्ट केल्याचा दावा केला आहे. तसेच इराणच्या ड्रोन हल्ल्यात कुवेतचे दोन वीज आणि पाणी शुद्धीकरण प्रकल्प बाधित झाले आहेत. कुवेत शहरात एका सरकारी इमारतीवरही ड्रोन हल्ला झाला असून मोठी हानी झाली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.