सौराष्ट्राने टाळली डावाच्या पराभवाची नामुष्की

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराणी चषक क्रिकेट स्पर्धेत रेस्ट ऑफ इंडियाचा संघ ड्रायव्हर सिटवर असला, तरी सौराष्ट्राने सोमवारी डावाने होणाऱया पराभवाची नामुष्की टाळण्यात यश मिळवले आहे. आघाडीची फळी अपयशी ठरल्यानंतर शेल्डॉन जॅक्सन, अर्पित वासवदा, प्रेरक मंडक व कर्णधार जयदेव उनाडकट यांनी दणकेबाज अर्धशतके ठोकून सौराष्ट्राचा डावाने पराभव टाळण्यात यश मिळवले. तिसऱया दिवसाचा खेळ संपला तेव्हा सौराष्ट्राने दुसऱया डावात 98 षटकांत 8 बाद 368 धावसंख्येपर्यंत मजल मारली होती. उनाडकट 78, तर पार्थ भट 6 धावांवर खेळत होते. आता सौराष्ट्राकडे 92 धावांची आघाडी आहे.

सौराष्ट्राचा 98 धावांत खुर्दा उडविल्यानंतर रेस्ट ऑफ इंडियाने 110 षटकांत 374 धावसंख्या उभारून पहिल्या डावात 276 धावांची आघाडी घेतली. प्रत्युत्तरादाखल सौराष्ट्राने दुसऱया दिवसाच्या 2 बाद 49 धावसंख्येवरून सोमवारी सकाळी पुढे खेळायला सुरुवात केली. मात्र रेस्ट ऑफ इंडियाचा वेगवान गोलंदाज कुलदीप सेनने चिराग जानी (6), चेतेश्वर पुजारा (1) व धमेंद्रसिंग जडेजा (25) ही मधली फळी सकाळच्या सत्रात कापून काढली. आता सौराष्ट्राला डावाने पराभवाला सामोरे जावे लागेल, असे वाटत असताना तळाच्या फलंदाजांनी रेस्ट ऑफ इंडियाचा गोलंदाजीचा अनपेक्षितपणे जोरदार प्रतिकार केला. शेल्डॉन जॅक्सन (71), अर्पित वासवदा (55) यांनी चौथ्या विकेटसाठी 117 धावांची भागीदारी केली.