केदारनाथ यात्रेसाठी आयआरसीटीसीची हेलिकॉप्टर सेवा

केदारनाथ मंदिर 2 मेपासून भाविकांसाठी खुले झाले आहे. केदारनाथाच्या दर्शनासाठी जगभरातून लाखो भाविक येतात. या पार्श्वभूमीवर इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) 2025 केदारनाथ यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा सुरू केली आहे. ही सेवा 2 मे ते 31 मे दरम्यान उपलब्ध होणार आहे. हेलिकॉप्टरची शटल सेवा तीन ठिकाणांहून उपलब्ध होणार आहे. फाटा, सिर्शी, गुप्तकाशी या मार्गावरून हवाई प्रवासाचा आनंद घेता येईल.

उत्तराखंड पर्यटन विभागाच्या वेबसाईटवर त्याची नोंदणी करता येईल. त्यासाठी नवीन युजर्सला अकाऊंट खोलावे लागेल. त्यामध्ये प्रवासाची माहिती, किती लोक आणि प्रवासाची तारीख लिहावी लागेल. त्यानंतर यात्रा नोंदणी पत्र डाऊनलोड करता येईल. हे पत्र हेलिकॉप्टर तिकीट बुक करताना लागेल. नोंदणी करताना मोबाईल नंबर आणि ई-मेल टाकावा. ओटीपी मिळताच लॉग इन करावे. प्रत्येक युजर दोन तिकीट बुक करू शकतो. एका तिकिटावर सहा लोक जाऊ शकतात.