आयर्लंडचा सनसनाटी विजय , 329 धावांचा केला यशस्वी पाठलाग

1395

पॉल स्टर्लिंग व ऍण्डी बालबिर्नी यांच्या धडाकेबाज शतकांच्या जोरावर आयर्लंडच्या क्रिकेट संघाने मंगळवारी मध्यरात्री झालेल्या तिसऱ्या वन डे लढतीत यजमान इंग्लंड संघावर सात गडी राखून सनसनाटी विजय मिळवला आणि थोडीतरी प्रतिष्ठा राखली. इंग्लंडने तीन वन डे सामन्यांची मालिकात 2-1 अशा फरकाने जिंकली. 142 धावांची खेळी साकारणारा पॉल स्टर्लिंग प्लेअर ऑफ दी मॅच ठरला. तसेच इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू डेव्हिड विली याची प्लेअर ऑफ दी सीरिज म्हणून निवड करण्यात आली.

आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 328 धावा तडकावल्या. आयर्लंडने अवघे तीन गडी गमावत लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. पॉल स्टर्लिंगने 128 चेंडूंत सहा गगनभेदी षटकार व 9 दमदार चौकारांसह 142 धावांची शानदार खेळी साकारली. तसेच कर्णधार ऍण्डी बालबिर्नीने 112 चेंडूंत 12 चौकारांसह 113 धावांची दमदार खेळी साकारली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 214 धावांची भागीदारी करताना आयर्लंडच्या विजयाची भक्कम पायाभरणी केली.

दरम्यान, याआधी कर्णधार इयॉन मॉर्गनच्या 106 धावांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने 328 धावांचा डोंगर उभारला होता. टॉम बॅण्टनने 58 धावांची तर डेव्हिड विलीने 51 धावांची खेळी करीत इंग्लंडच्या धावसंख्येत मोलाची भर घातली. टॉम करणने नाबाद 38 धावा तडकावल्या. आयर्लंडकडून क्रेग यंगने 53 धावा देत तीन फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

आपली प्रतिक्रिया द्या