
सामना प्रतिनिधी, मुंबई
धारावीमधील बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीचा लोखंडी पाइप रिक्षावर कोसळून एक जण ठार झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर शीव रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली.
धारावी येथे पीएमजीपी कॉलनी, बस आगाराच्या बाजूला असलेल्या बिल्डिंग क्रमांक 4- ‘ए’ या ‘म्हाडा’च्या इमारतीत 7 ते 20 व्या मजल्यावर कन्स्ट्रक्शनचे काम सुरू होते. रविवारी रात्री अचानक इमारतीचा लोखंडी पाइप रिक्षावर कोसळला. यामध्ये शहादाद शराफत अली अन्सारी (32) या रिक्षा चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेत शामलाल जोहरालाल जयस्वाल (60) व साजिद खान (33) हे दोघे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी शीवच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस व अग्निशमन दलाने तत्काळ बचावकार्य सुरू केले.
कंत्राटदाराचा बेजबाबदारपणा
संबंधित इमारतीचे काम सुरू असताना लोखंडी पाइप कोसळल्यानेच ही दुर्घटना घडली. या कामात कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणामुळेच पाइप कोसळल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे दुर्घटनेची चौकशी करून जबाबदार असलेल्यांवर कारकाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
नागपाडा येथे इमारतीचा स्लॅब कोसळून तीन जखमी
धारावी येथील दुर्घटनेनंतर काही तासांतच नागपाडा येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले. दुपारी 3.30 वाजता ही घटना घडली. यावेळी काहीजण ढिगाऱ्याखाली अडकल्याने भीतीचे वातावरण तयार झाले होते.
नागपाडा पोलीस ठाणे, पीर खान स्ट्रीटजवळ या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. यावेळी इमारतीचा स्लॅब अचानक कोसळला. कोसळलेल्या ढिगाऱयाखाली तीन जण अडकल्याची माहिती मिळताच परिसरात रहिवाशांची धाकपळ उडाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, एनडीआरएफ व पोलिसांनी तात्काळ बचावकार्य सुरू करून अडकलेल्या तिघांना सुखरूप बाहेर काढले. यामध्ये ताजूबुल शेख (23), अभिमन्यू रॉय (32), हमजाबीन अल्लाबीन (28) हे ढिगाऱ्याखाली अडकले होते. हे तिघेही जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींवर जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षातून देण्यात आली.



























































