
सीमेपलीकडून हिंदुस्थानविरोधात कारस्थानं रचणाऱ्या पाकिस्तानातील आयएसआय (ISI) या गुप्तचर संघटनेचा एक अत्यंत भयंकर कट उघडकीस आला आहे. हिंदुस्थानी लष्कराच्या हालचालींवर चोवीस तास पाळत ठेवण्यासाठी दिल्लीपासून थेट कश्मीरपर्यंत महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर छुप्या पद्धतीने सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे बसवण्याचे पाखंडी धाडस या जासूसी रॅकेटने केले होते. गाझियाबाद पोलिसांनी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत या प्रकरणाचा छडा लावत आतापर्यंत ११ जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
लष्कराची लाईव्ह माहिती पाकला पाठवण्याचा कट
पकडण्यात आलेल्या आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली आणि सोनीपत रेल्वे स्थानकांसह लष्करी तळांच्या आसपास सौर ऊर्जेवर चालणारे (Solar Powered) हाय-टेक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची त्यांची योजना होती. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून हिंदुस्थानी लष्कराची हालचाल, शस्त्रास्त्रांची ने-आण आणि तुकड्यांच्या प्रवासाची लाईव्ह माहिती थेट पाकिस्तानातील हँडलर्सना दिली जात होती. यासाठी एका विशेष मोबाईल ॲप्लिकेशनचा वापर केला जात होता, ज्याचे प्रशिक्षण या जासूसांना ऑनलाइन पद्धतीने पाकिस्तानातून मिळाले होते.
या जासूसी रॅकेटचा मास्टरमाइंड सुहैल मलिक उर्फ रोमिओ असून, साने इरम उर्फ महक नावाची महिलाही या नेटवर्कमध्ये सक्रिय होती. धक्कादायक बाब म्हणजे, या रॅकेटची पाळेमुळे केवळ उत्तर प्रदेशच नाही, तर बिहार, महाराष्ट्र आणि नेपाळपर्यंत पसरलेली आहेत. पैशांच्या आमिषाने काही स्थानिक तरुणांना आणि ५ अल्पवयीन मुलांनाही या रेकीच्या कामात ओढले गेले होते.
हे जासूसी जाळे चालवण्यासाठी हिंदुस्थानी सिम कार्डांचा वापर करून त्यांचे ओटीपी (OTP) थेट पाकिस्तानात पाठवले जात होते. तिथून व्हॉट्सॲप आणि सोशल मीडिया खाती चालवून हिंदुस्थानविरोधी कारवायांचे नियोजन केले जाई. एका ओटीपीसाठी ५०० ते ५००० रुपयांपर्यंतची रक्कम या तरुणांना मिळत असे. हे पैसे थेट खात्यात न घेता जनसेवा केंद्रे किंवा दुकानांमधून रोख स्वरूपात घेतले जात होते, जेणेकरून तपास यंत्रणांची नजर चुकवता येईल.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन दोन एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे. या पथकात सायबर क्राईम, गुप्तचर विभाग आणि स्वाट (SWAT) टीमचा समावेश आहे. सध्या पोलीस फरार असलेल्या नौशाद अली आणि समीर उर्फ शूटर या दोघांचा शोध घेत आहेत. या कारवाईमुळे पाकड्यांचा हिंदुस्थानी लष्करावर पाळत ठेवण्याचा एक मोठा आणि नापाक कट उधळून लावण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले आहे.

























































