ऑपरेशन रोअरिंग लायन! इराणवर 18 हजार बॉम्बचा वर्षाव, इस्त्रायलने दिला 40 दिवसांच्या युद्धाचा हिशोब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आखाती देशात सुरू असलेल्या युद्धादरम्यान अमेरिका-इराणमध्ये दोन आठवड्याच्या युद्धविरामाची घोषणा झाली. मात्र तरी देखील इस्त्रायलने आपले हल्ले सुरूच ठेवले आहेत. दरम्यान इस्त्रायने संरक्षण दलाने (IDF) ‘ऑपरेशन रोअरिंग लायन’ ही मोहिम राबवली असून त्याचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. गेल्या 40 दिवसांच्या युद्धात इस्त्रायलने इराणच्या हद्दीत शिरून तब्बल 18 हजार बॉम्ब फेकल्याचा दावा या अहवालातून करण्यात आला आहे. या आक्रमक मोहिमेमुळे इराणच्या लष्करी तळांचे आणि क्षेपणास्त्र निर्मिती केंद्रांचे प्रचंड नुकसान झाल्याचे इस्त्रायलने म्हटले.

आज तक दिलेल्या वृत्तानुसार, इस्त्रायच्या वायुसेनेने ‘ऑपरेशन रोअरिंग लायन’ या मोहिमेदरम्यान 8 हजार 500 पेक्षा जास्त उड्डाणे घेतली, ज्यातील हजारहून अधिक हल्ले थेट इराणच्या सीमेच्या आत जाऊन करण्यात आले. या काळात इराणमधील 4,000 हून अधिक ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. लष्करी पायाभूत सुविधा आणि 10,800 स्ट्राइक पॉइंट्सवर झालेल्या या हल्ल्यांमुळे इराणची संरक्षण यंत्रणा खिळखिळी झाल्याचे इस्त्रायलने म्हटले आहे. इस्रायली लष्कराने इराणमध्ये 18,000 हून अधिक बॉम्ब टाकल्याचा दावा देखील केला आहे.दक्षिण लेबनॉनमध्येही इस्त्रायलकडून सातत्याने एअरस्ट्राइक केले जात आहेत.

इराण आणि अमेरिका यांच्यात बुधवारी दोन आठवड्यांचा तात्पुरता युद्धविराम जाहीर झाला. या पार्श्वभूमीवर, येत्या शनिवारपासून पाकिस्तानमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. अमेरिकेने इराणच्या 10 अटी मान्य केल्या आहे. त्यामुळे हा आमचा विजय असल्याचा दावा इराणने केला आहे. मात्र, इस्त्रायलच्या मते हा युद्धविराम केवळ तात्पुरता असून दोन्ही बाजूंना स्वतःला सावरण्यासाठी मिळालेली ही एक संधी आहे.

युद्धविराम लागू असतानाही इस्त्रायल सतर्क असून आपल्या शस्त्रास्त्रांचा साठा आणि इंटरसेप्टर सिस्टम पुन्हा सज्ज करण्यावर भर देत आहे. उत्तर सीमेवर हिजबुल्लाहकडून मिळणाऱ्या आव्हानांना उत्तर देण्यासाठी त्यांची कारवाई सुरूच राहील, असे इस्त्रायली अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. इराणच्या लष्करी शक्तीला कमकुवत करणे हाच या संपूर्ण मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे इस्त्रायलने स्पष्ट केले आहे.

US Iran Israel War अखेर दोन आठवड्यांचा युद्धविराम! ट्रम्प यांची घोषणा, इराणने प्रस्ताव स्वीकारला, पाकिस्तानची मध्यस्थी