इस्त्रायल आणि हमास यांच्यामध्ये युद्ध सुरू होऊन वर्ष उलटले आहे. मागच्या वर्षी 7 ऑक्टोबरला हमासने इस्त्रायलवर हल्ला केल्यानंतर युद्धाची ठिणगी पडली. तेव्हापासून दोघांमधील संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाहीये. आता गाझामधून भयंकर फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये भटके कुत्रे बेवारस मृतदेहांचे लचके तोडून खाताना दिसत आहेत. गाझाच्या उत्तरेला इस्रायलच्या हल्ल्यात ठार झालेल्या पॅलेस्टीनींचे मृतदेह आढळून आपल्याला आणि आपल्या सहकाऱ्यांना आढळून आले. अनेक मृतदेहांचे लचके भटक्या कुत्र्यांनी तोडून खाल्ले आहेत, असे गाझाच्या आपत्कालीन सेवांचे प्रमुख फारेस अफाना यांनी सांगितले.
फारेन अफाना यांनी सीएनएनला दिलेल्या माहितीनुसार, भटके कुत्रे रस्त्यावर बेवारस पडलेल्या मृतदेहांचे लचके तोडून खात आहेत. त्यामुळे आमच्यासाठी मृतदेहांची ओळख पटवणे कठीण होत आहे. त्यांनी गाझाच्या उत्तरेतील आणि जबालिया क्षेत्रामध्ये हवाई आणि जमिनीवरील हल्ल्यांचा उल्लेख केला. इस्त्रायली सैनिक थांबण्याचे नाव घेत नाहीये. त्यामुळे गाझाच्या मृतदेहांवर अंत्यविधी करणेही कठीण झाले आहे.
दरम्यान, युनायटेड नेशन्स रिलीफ अँड वर्क्स एजन्सी फॉर पॅलेस्टाईन रिफ्यूज इन द निअर ईस्ट ((UNRWA) ने बुधवारी गाझामध्ये उपासमारीचा इशारा दिला आहे. एका पत्रकार परिषदेत UNRWA चे प्रमुख फिलीप लाजारिनी म्हणाले की, गाझामध्ये उपासमार आणि कुपोषण सारखी परिस्थिती उद्भवू शकते. आता ही एक नापीक जमीन बनली असून तिथे राहण्यासारखे काहीच उरले नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.