
अमेरिका, इस्रायल-इराणमधील युद्ध अधिक तीव्र होत आहे. तसेच अमेरिका आणि इराण यांच्या परस्परविरोधी भूमिकांमुळे संभ्रम अधिक वाढत आहे. इराणचे सध्याचे नेतृत्व नष्ट झाल्यानंतर तेथील राजवट लवकर कोसळेल असे मानले जात होते. मात्र, तसे झाले नाही आणि इराणने अधिक आक्रमक होत इस्रायलसह आखाती देशात विनाशाला सुरूवात केली. त्यातच आता मोसदच्या इशाऱ्याची चर्चा होत आहे.
काही वृत्तांनुसार इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादचे प्रमुख डेव्हिड बार्निया यांनी युद्ध सुरू होण्यापूर्वीच हे स्पष्ट केले होते की, इराणमध्ये सत्तापालट शक्य आहे, मात्र, त्यासाठी वेळ लागेल. त्यांच्या अंदाजानुसार, ही प्रक्रिया काही दिवसांत किंवा आठवड्यांत नव्हे, तर सुमारे एक वर्ष चालू शकते.
आखाती देशातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एका नवीन गुप्तचर अहवालाने एक महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. इराणमधील सत्तापालट कदाचित लवकर होणार नाही, तर त्याला सुमारे एक वर्ष लागू शकते. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या रणनीतीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे, की ते इतक्या दीर्घकाळ चालणाऱ्या युद्धासाठी तयार आहेत का? असा प्रश्न या अहवालातील माहितीनंतर उपस्थित होत आहे.
बार्निया यांनी इस्रायली मंत्रिमंडळासमोर युद्धाचे अनेक संभाव्य परिणाम सादर केले होते. त्यात काही महिन्यांच्या कालावधीचाही समावेश होता. परंतु सर्वात वास्तववादी अंदाज एक वर्षाचा मानला जात होता. तथापि, युद्ध सुरू झाल्यानंतर चित्र वेगळेच दिसू लागले. काही वृत्तांमध्ये असा दावा करण्यात आला होता की, इराणमध्ये काही दिवसांतच उठाव होऊ शकतो आणि सरकार कोसळू शकते, परंतु आतापर्यंत तसे काहीही घडलेले नाही.
युद्धाच्या तीन आठवड्यांनंतर इराणमधील परिस्थिती कमकुवत झाली आहे. मात्र, अद्यापही इराणवर नेतृत्वाचे पूर्ण नियंत्रण आहे. यामुळेच आता इस्रायल आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान, मोसाद प्रमुखांनाही लक्ष्य केले जात आहे. अज्ञात सूत्रांचा हवाला देत वृत्तांमध्ये त्यांच्यावर सरकारला खोटी आशा दिल्याचा आरोप केला जात आहे. तथापि, अहवालात असेही म्हटले आहे की त्यांचे मूल्यांकन नेहमीच सावध आणि सशर्त होते, ते निश्चित भाकीत नव्हते.
इराणमधील सत्तापालट इतका सोपा नाही. त्यासाठी अनेक अटींची आवश्यकता असते, जसे की सर्वोच्च नेतृत्वाला कमकुवत करणे, सरकारी संस्थांना नुकसान पोहोचवणे आणि जनतेचा विरोध वाढवणे, आणि हे सर्व एका दीर्घ प्रक्रियेचा भाग आहे. अमेरिकेच्या गुप्तचर प्रमुख तुलसी गबार्ड यांनीही अलीकडेच म्हटले आहे की इराणचे सरकार कमकुवत झाले आहे, पण ते अजूनही अस्तित्वात आहे. बेंजामिन नेतान्याहू यांनीही हे मान्य केले की, आम्ही परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करत आहोत, परंतु सरकार पडेल की नाही हे निश्चित नाही. या संपूर्ण घडामोडीमुळे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे: इस्रायल आणि अमेरिका अशा दीर्घकाळ चालणाऱ्या युद्धासाठी तयार आहेत का? कारण जर हे युद्ध एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ चालले, तर त्याचा परिणाम केवळ लष्करी आघाडीवरच नाही, तर अर्थव्यवस्था, राजकारण आणि सामान्य लोकांच्या जीवनावरही होईल. त्यामुळे युद्ध कधी संपणार, हा प्रश्न अजूनही तसाच आहे.


























































