
अमेरिका, इस्रायल- इराण यांचे युद्ध 11 व्या दिवशीही सुरू असून ते अधिक तीव्र झाले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे नवे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनी यांना थेट धमकी दिली होती. ट्रुथ सोशलवरील एका पोस्टमध्ये ट्रम्प म्हणाले होते की जर इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीत तेलाचा प्रवाह थांबवण्याचा प्रयत्न केला तर अमेरिकेने इराणवर मागील हल्ल्यांपेक्षा वीस पट जास्त हल्ला करेल. तसेच इराणचे नवे नेते मोज्तबा खामेनी शांततेत राहू शकणार नाहीत. आम्ही त्यांनाही संपवू, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली होती. ट्रम्प यांच्या धमकीला इराणने ठोस प्रत्युत्तर दिले आहे.
इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारीजानी यांनी मंगळवारी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना धमकी दिली. एक्सवरील एका पोस्टमध्ये लारीजानी यांनी लिहिले आहे की, तुमच्यापेक्षा मोठे लोकही इराणला संपवू शकले नाहीत. इराणला संपवणे कोणालाही शक्य नाही. स्वतःची काळजी घ्या, सावध राहा, स्वतःची काळजी घ्या नाहीतर तुम्हीच नष्ट व्हाल, अशी थेट धमकी इराणने ट्रम्प यांना दिली आहे.
ट्रम्प म्हणाले होते की, मृत्यू, आग आणि भय यांचे तांडव इराणमध्ये असेल, मला आशा आहे आणि प्रार्थना आहे की ते घडू नये! तसेच ट्रम्प यांनी मोज्तबा खामेनी यांना धमकी दिली आहे आणि म्हटले आहे की ते शांततेत जगू शकणार नाहीत. इराणच्या नेत्याच्या निवडीबद्दल त्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. मोज्तबा खमेनी यांच्या नियुक्तीपूर्वी, ट्रम्प यांनी आग्रह धरला की व्हेनेझुएलामध्ये अमेरिकेच्या पूर्वीच्या सहभागाप्रमाणेच इराणसाठी पुढील नेता निवडण्यात अमेरिकेचा सहभाग असला पाहिजे. मात्र, इराणने त्याला दाद दिली नाही. इराणने मंगळवारी इस्रायल आणि आखाती अरब देशांवर नवीन हल्ले सुरू केले कारण इस्रायल आणि अमेरिकेने सुरू केलेल्या युद्धात मध्य पूर्वेवर दबाव कायम ठेवला होता ज्यामुळे जागतिक बाजारपेठा हादरल्या आहेत आणि थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. ट्रम्प यांच्या धमकीनंतर आता इराणने त्यांनाच थेट धमकी दिल्याने हे युद्ध आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.


























































