दशतवादाविरोधातील लढाईत इस्रायल हिंदुस्थानसोबत; सर्वतोपरी मदत करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

दहशतवादाविरोधातील लढाईत इस्रायलने हिंदुस्थानला बिनशर्त मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. महत्वाचे म्हणजे या मदतीसाठी कोणतीही मर्यादा नाही. हिंदुस्थानला लागेल तितकी मदत आणि सहकार्य करायला आम्ही तयार आहोत असे इस्रायलचे राजदूत डॉ. रॉन मल्का यांनी म्हटले आहे. इस्रायलने हिंदुस्थानला सर्व प्रसंगात साथ देण्याचा शब्द दिला आहे.आता हिंदुस्थान दहशतवादाच्या मोठ्या संकटाशी सामना करत आहे. या लढाईत आम्ही हिंदुस्थानसोबत असून त्यांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल असे ते म्हणाले.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यामुळे हिंदुस्थान-पाकिस्तानातील तणाव वाढला आहे. हिंदुस्थानने पाकिस्तानवर कठोर कारवाई करावी अशी मागणी देशभरातून होत आहे. या दहशतवादाविरोधातील लढाईत जागतिक पाठिंबा मिळवण्याचे हिंदुस्थानचे प्रयत्न सुरू आहेत. इस्रायल हिंदुस्थानला नेमकी काय मदत करणार याबाबत डॉ. रॉन मल्का म्हणाले, या मदतीला कोणतीही मर्यादा नाही. या लढाईत सर्वतोपरी मदत आम्ही करणार आहोत. हिंदुस्थानने इस्रायलसारखे धोरण अवलंबून पाकिस्तानवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. इस्रायल दहशतवादाविरुद्ध कठोर आणि वेगवान कारवाईसाठी ओळखला जातो. हिंदुस्थानला संरक्षणासाठी जी काही गरज लागेल ती मदत करायला आम्ही तयार आहोत. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत आम्ही आमच्या जवळच्या मित्राला लागेल ती मदत करु. दहशतवाद हा फक्त हिंदुस्थान आणि इस्रायलची नव्हे तर संपूर्ण जगाची समस्या आहे असे मल्का यांनी सांगितले. मल्का इस्त्रायली लष्करात होते. कर्नल पदावर असताना ते लष्करातून निवृत्त झाले. हिंदुस्थान इस्त्रायलचा महत्वाचा सहकारी आणि जवळचा मित्र असल्याचे आपल्याला पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हिंदुस्थानला सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना दिल्याचे ते म्हणाले.