इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या निवडीत सहभागी असणाऱ्यांना लक्ष्य करणार, इस्रायलचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराणमधील पुढील सर्वोच्च नेत्याच्या (Supreme Leader) निवड प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला लक्ष्य करण्याचा थेट आणि गंभीर इशारा इस्रायलने दिला आहे. इस्रायल संरक्षण दलाने (IDF) हा इशारा दिला आहे. मध्य-पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलने इराणच्या अंतर्गत सत्तांतराच्या प्रक्रियेवरच निशाणा साधल्याने खळबळ उडाली आहे.

इराणमध्ये सर्वोच्च नेत्याची निवड करणाऱ्या अेंसेब्ली ऑफ एक्सपर्ट्स (Assembly of Experts) मधील सदस्यांना उद्देशून हा इशारा देण्यात आला असल्याचे समजते. “तुम्हाला लक्ष्य करताना आम्ही अजिबात मागे पुढे बघणार नाही,” अशा कठोर शब्दांत इस्रायलने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. इराणचे नेतृत्व हे प्रदेशातील अशांततेसाठी आणि इस्रायलच्या सुरक्षेला असलेल्या धोक्यासाठी कारणीभूत असल्याचे इस्रायलने म्हटले आहे.

इराणमध्ये भविष्यातील नेतृत्वाबाबत विविध चर्चा सुरू असताना हा इशारा देण्यात आला आहे. इस्रायलच्या या पवित्र्यामुळे केवळ इराणमधील राजकीय वर्तुळातच नव्हे, तर जागतिक स्तरावरही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे दोन्ही देशांमधील संघर्ष आता थेट इराणच्या सर्वोच्च शासन व्यवस्थेपर्यंत पोहोचला असून, येणाऱ्या काळात याचे पडसाद संपूर्ण मध्य-पूर्वेत उमटण्याची दाट शक्यता आहे.