
इस्रायलच्या तेल अवीव्ह येथील बेन गुरीयन आंतरराष्ट्रीय विमानतळावर हुती बंडखोरांनी केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा इस्रायलने ताबडतोब बदला घेतला. येमेनच्या हुती बंडखोरांच्या नियंत्रणाखाली असलेल्या बंदरांचे शहर हुदैदाह येथे 20 फायटर जेट्समधून तब्बल 50 ठिकाणी बॉम्बहल्ले करण्यात आले. 2 हजार किमी अंतरावरून अचूक लक्ष्यभेद करण्यात आला. हुदैदार बंदर आणि बाजिल पंक्रीट फॅक्टरीला निशाणा बनवण्यात आले.
इस्रायलच्या हल्ल्यानंतर हुती बंडखोर आक्रमक झाले असून या हल्ल्याचा बदला घेणार असल्याचा इशारा दिला आहे. इस्रायलने केलेल्या हल्ल्यात किमान 21 जण गंभीर जखमी झाल्याचे हुती बंडखोरांच्या प्रसिद्धी विभागाचे प्रमुख नसरुद्दीन आमेर यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या पाठिंब्याने इस्रायलने हा हल्ला केल्याचा दावाही त्यांनी केला आहे. मात्र, अमेरिकेच्या संरक्षण दलातील अधिकाऱयाने मात्र हा दावा फेटाळून लावला आहे.