‘गगनयान’वर 14 हजार कोटींचा खर्च, चांद्रयान-3 मोहिमेचीही तयारी पूर्ण

262

इस्रोच्या महत्त्वाकांक्षी गगनयान या अंतराळ मोहिमेवर तब्बल 14 हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर लाल किल्ल्यावरून गगनयानची घोषणा केली होती. या मोहिमेला 2018 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती.

अंतराळ विज्ञानाच्या माध्यमातून हिंदुस्थानवासीयांचे जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार असून ‘गगनयान’ आणि ‘चांद्रयान’ या दोन महत्त्वपूर्ण मोहिमांसाठीची बरीच तयारी गेल्या वर्षीच करण्यात आल्याचे इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी म्हटले आहेय. आज बुधवारी बंगळुरूत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ‘गगनयान’ आणि ‘चांद्रयान-3’बाबतची माहिती दिली. दरम्यान, गगनयान मोहिमेत महिला अंतराळवीराचा समावेश नसेल, असेही सिवन यांनी स्पष्ट केले आहे.

अंतराळवीरांना रशियात प्रशिक्षण
गगनयान मोहिमेसाठी निवड करण्यात आलेल्या चार अंतराळवीरांना रशियात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जानेवारीच्या तिसऱया आठवडय़ापासून त्यांच्या प्रशिक्षणाला सुरुवात होईल. तसा करार रशियाची अंतराळ संस्था ग्लावकॉस्मोसबरोबर करण्यात आला आहे. गगनयानसाठी एक राष्ट्रीय सल्लागार समितीही स्थापन करण्यात आली असून 2019 मध्येच गगनयान मोहिमेत इस्रोने चांगली प्रगती केल्याचेही सिवन यांनी सांगितले.

‘चांद्रयान-3’साठी 250 कोटी रुपये खर्च
चांद्रयान-3 मोहिमेसाठी सरकारची मंजुरी मिळाली असून या मोहिमेवर 250 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे सिवन यांनी सांगितले. या मोहिमेवर कामही सुरू झाले असून चांद्रयान-3 चे स्वरूप, त्याचे विविध भाग चांद्रयान-2 प्रमाणेच असतील, असेही सिवन म्हणाले.

तुतीकोरीनमध्ये उभारणार देशातील दुसरे स्पेस पोर्ट
देशातील दुसरे स्पेस पोर्ट तामीळनाडूच्या तुतीकोरीनमध्ये उभारण्यात येणार आहे. त्यासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रियाही सुरू करण्यात आल्याचे सिवन म्हणाले. गगनयान मोहिमेसाठी रशियाची मदत घेण्यात येणार असल्याचे सिवन यांनी सांगितले. दरम्यान, येणाऱया काळात इस्रो मंगळपासून ते शनीपर्यंतच्या महत्त्वाकांक्षी मोहिमा आखणार असून त्यावरही वेगाने काम सुरू आहे.

विक्रम लॅण्डरचे अवशेष शोधणाऱयाचे अभिनंदन!
विक्रम लॅण्डरचे अवशेष शोधणाऱया चेन्नईच्या षण्मुग सुब्रमणियन या तरुण अभियंत्याचेही सिवन यांनी यावेळी अभिनंदन केले. तसेच विक्रम लॅण्डरच्या अवशेषांची छायाचित्रे प्रसिद्ध न करण्याचे इस्रोचे धोरण आहे.

असे असेल ‘चांद्रयान-3’
– चांद्रयान-2 प्रमाणेच चांद्रयान-3 मध्येही लँडर, रोव्हर असणार आहे. याचे ऑर्बिटरही सात वर्षे काम करील. चांद्रयान-2 चे ऑर्बिटर सुस्थितीत असून ते अजूनही काम करत आहे.
– चांद्रयान-3 साठी बंगळुरूच्या तुतीकोरीन या ठिकाणी खास स्पेस पोर्ट तयार करण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या