इटलीने 47 वर्षांनंतर जिंकला डेव्हिस करंडक, किताबी लढतीत ऑस्ट्रेलियावर मात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इटलीने टेनिसचा वर्ल्ड कप म्हणून ओळखली जाणारी डेव्हिस करंडक स्पर्धा तब्बल 47 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जिंकण्याचा पराक्रम केला. त्यांनी किताबी लढतीत 28 वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियाचा 2-0 ने पराभव करीत जेतेपदाला गवसणी घातली.

इटलीने याआधी 1976 साली पहिल्यांदा डेव्हिस करंडक जिंकला होता. या स्पर्धेच्या 123 वर्षांच्या इतिहासात इटलीचे हे केवळ दुसरे विजेतेपद होय. मातियो अर्नाल्डीने सलामीच्या एकेरी लढतीत ऑस्ट्रेलियाच्या एलेक्सेई पोपिरिनचा 7-5, 2-6, 6-4 असा पराभव करीत इटलीला आश्वासक सुरुवात करून दिली. त्यानंतर इटलीच्या यानिक सिनरने ऑस्ट्रेलियाच्या एलेक्स डी मिनोरचा दुसऱया एकेरीत 6-3, 6-0 असा सरळ सेटमध्ये पराभव करीत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

हिंदुस्थान तीन वेळा उपविजेता

डेव्हिस करंडक टेनिस स्पर्धेच्या इतिहासात हिंदुस्थानने आतापर्यंत तीन वेळा उपविजेतेपद पटकावले होते. 1966मध्ये हिंदुस्थानने पहिल्यांदा उपविजेतेपद जिंकले होते. त्यानंतर 1974 व 1987 साली देखील हिंदुस्थानला उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले. ही स्पर्धा 1900 साली सुरू झाली असून, आतापर्यंत 16 संघांनी ही स्पर्धा जिंकलेली आहे. अमेरिकेने सर्वाधिक 32 वेळा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.