रात्रशाळा टिकवण्यासाठी पटसंख्या अट शिथिल करा, ज. मो. अभ्यंकर यांची मागणी

पटसंख्येअभावी राज्यातील रात्रशाळा बंद केल्या जात आहेत. त्या बंद होऊ नयेत म्हणून पटसंख्येची अट शिथिल करा अशी मागणी शिवसेना आमदार ज. मो. अभ्यंकर यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे विधान परिषदेत केली.

कष्टकरी आणि कामगार वर्गातील मुले-मुली नोकरी करता-करता रात्रशाळांमध्ये शिक्षण घेतात, परंतु शिक्षक आणि विद्यार्थी संख्या कमी होऊ लागल्याने रात्रशाळा बंद पडू लागल्या आहेत. राज्यात ज्या रात्रशाळा सुरू आहेत त्यामध्ये फक्त 544 शिक्षक आणि 16 हजार विद्यार्थी आहेत. रात्रशाळांमधील शिक्षकांना नियमित करण्याची आवश्यकता आहे आणि अतिरिक्त शिक्षकांना दिवसशाळांमध्ये सामावून घेतले पाहिजे, अशी मागणी अभ्यंकर यांनी केली.

रात्रशाळांमध्ये 200 हून अधिक शिक्षक अतिरिक्त असून त्यांना अन्य शाळांमध्ये सामावून घेण्याबाबत संबंधितांची बैठक घेऊन मार्ग काढला जाईल असे आश्वासन मंत्री दादा भुसे यांनी दिले. रात्रशाळांमध्ये मुख्याध्यापकांना मान्यता द्यावी अशी मागणी शिक्षक आमदार सुधाकर आडबाले यांनी यावेळी केली. ती बाबही तपासून पाहिली जाईल असे भुसे यांनी सांगितले.