जे. पी. नड्डा होणार भाजपचे नवे अध्यक्ष

424

भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बढती मिळणार आहे. अध्यक्षपदासाठी ते येत्या सोमवारी अर्ज दाखल करतील. इतर कोणी दावेदार नसल्यामुळे गृहमंत्री अमित शहा यांच्यानंतर नड्डा यांच्याकडेच पक्षाध्यक्षपदाची सूत्रे येतील अशी शक्यता आहे. येत्या सोमवारी, 20 जानेवारीला निवडीवर शिक्कामोर्तब होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजपची सत्ता असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री, राज्यांचे प्रदेशाध्यक्ष हे नड्डा यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवतील. अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सोमवारी संपणार आहे. त्यामुळे पक्षाचे 11 वे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नड्डा यांचीच बिनविरोध निवड घोषित केली जाईल असे बोलले जात आहे. ही निवड बिनविरोध न झाल्यास दुसऱया दिवशी निवडणूक घेतली जाईल, असे पक्षातर्फे शुक्रवारी स्पष्ट करण्यात आले.

नड्डा हे राज्यसभेचे खासदार असून पक्षाच्या संसदीय बोर्डाचे सचिव आहेत. त्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशची जबाबदारी घेत तेथील 80 पैकी 62 जागा पक्षाला जिंकून दिल्या. अमित शहा हे गृहमंत्री बनल्यानंतर जून 2019 मध्ये ते पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष बनले होते.

आपली प्रतिक्रिया द्या