जयदत्त क्षीरसागर पुन्हा भाजपा नेत्यांसोबत व्यासपीठावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड

राष्ट्रवादीचे विधीमंडळातील उपनेते आमदार जयदत्त क्षीरसागर शनिवारी पुन्हा एकदा भाजपा नेत्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या विकास कामाच्या व्यासपीठावर दाखल झाले आहेत. नितीन गडकरी, पंकजा मुंडे, सुरेश धस, प्रीतम मुंडे हे गेवराईमध्ये राष्ट्रीय महामार्ग २११ च्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त उपस्थित राहत आहेत.

गेवराईत अवघ्या काही वेळामध्ये राष्ट्रीय महामार्ग २११ संभाजीनगर-येडशी या कामासह नगर परिषदेच्या विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा गेवराईमध्ये पार पडत आहे. या लोकार्पण सोहळ्यानंतर जाहीर सभेचेही आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला नितीन गडकरी, पालकमंत्री पंकजा मुंडे, खा.प्रीतमताई मुंडे, आ.सुरेश धस, आ.आर.टी.देशमुख, आ.भीमराव धोंडे, आ.संगिताताई ठोंबरे यांच्यासह भाजपाची टीम उपस्थित राहाणार आहे. कार्यक्रमाचे संयोजक भाजपाचे आमदार लक्ष्मणराव पवार हे आहेत.

विकासकामाच्या या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे विधीमंडळातील उपनेते आ.जयदत्त क्षीरसागर गेवराईमध्ये दाखल झाले आहेत. ते व्यासपीठावर विजरामानही झाले आहेत. या लोकार्पण कार्यक्रमासाठी नितीन गडकरी येणार आहेत म्हणून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या कार्यक्रमाकडे लागले आहे. अलिकडच्या काळात जयदत्त क्षीरसागर आणि भाजपाच्या नेत्यांसोबत उठबस वाढली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष क्षीरसागरांच्या भूमिकेकडे लागले आहे.