मालवणातील शिवपुतळा दुर्घटनेप्रकरणी अटक केलेल्या शिल्पकार जयदीप आपटेचा जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी फेटाळला. दोन दिवसांपूर्वी बांधकाम सल्लागार चेतन पाटीलला जामीन नाकारला होता. त्यापाठोपाठ आपटेला न्यायालयाने झटका दिला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना पुरेशी काळजी न घेतल्याचा सरकारी वकिलांचा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला.
राजकोट किल्ला परिसरात उभारलेला शिवपुतळा अवघ्या आठ महिन्यांत कोसळला. या घटनेने पुतळा उभारणीचे निकृष्ट काम उघड झाल्यानंतर शिल्पकार जयदीप आपटेला 4 सप्टेंबर रोजी कल्याणमधून अटक केली होती. त्याच्या अर्जावर सिंधुदुर्गचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. बी. गायकवाड यांच्यापुढे सुनावणी झाली. सरकारी वकील गजानन तोडकरी व सहाय्यक सरकारी अभियोक्ता रुपेश देसाई यांनी जामीन अर्जावर तीव्र आक्षेप घेतला.