शिवपुतळा दुर्घटना प्रकरणात जयदीप आपटेंच्या पत्नीची चौकशी; कल्याणमध्ये घरासमोर संभाजी ब्रिगेडचे आंदोलन

सिंधुदुर्गात मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी शिल्पकार जयदीप आपटेंच्या पत्नीला ताब्यात घेतले आहे. शिवपुतळा दुर्घटना प्रकरणानंतर शिल्पकार जयदीप आपटे फरार आहेत. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. मात्र, जयदीपबाबत पोलिसांच्या हाती अद्याप कोणतेही धागेदोरे लागलेले नाहीत. यामुळे पोलिसांनी जयदीप यांच्या पत्नीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 डिसेंबर 2023 रोजी मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. मात्र अनावरण केल्यानंतर अवघ्या आठ महिन्यांनी म्हणजे 26 ऑगस्ट 2024 रोजी हा पुतळा कोसळला. यानंतर शिल्पकार जयदीप आपटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर जयदीप आपटे फरार झाले आहेत.

‘शिवद्रोही’… संभाजी ब्रिगेडचे आंदोलन

शिवपुतळा दुर्घटनेनंतर राज्यात सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. राजकीय वर्तुळातूनही राज्य सरकार आणि शिल्पकार जयदीप आपटे यांच्यावर टीका होत आहे. आपटे यांच्या कल्याण येथील घरासमोर संभाजी ब्रिगेडने आंदोलन करत ‘शिवद्रोही’ असा उल्लेख असलेले आपटेचे फोटो घरावर चिकटवले आहेत.

जयदीप आपटे फरार असून त्यांची पत्नी शहापूर येथे नातेवाईकांच्या घरी राहत आहे. पोलिसांनी शहापूर येथून जयदीपच्या पत्नीला ताब्यात घेत तिची चौकशी केली. जयदीप यांनी मालवणला जातो, असे सांगितल्याचे त्यांच्या पत्नीने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी जयदीप यांच्या पत्नीकडून मालवण आणि कोकण परिसरातील त्यांच्या नातेवाईकांची नावे व पत्ते घेतले आहेत.