
उच्च न्यायालयाचा आदेश धुडकावत जैन समाज आणि कबुतरप्रेमींच्या मोठय़ा जमावाने आज दादर कबुतरखाना येथे धडक दिली. आक्रमक आंदोलकांनी कबुतरखान्याचे छत तोडत ताडपत्री खाली खेचली आणि बांबूही काढून फेकले. यावेळी तुफान राडा झाला. पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार झटापट झाली. त्यातच काही आंदोलकांनी बंदी मोडून पोलिसांसमोरच पक्ष्यांना दाणेही घातले. त्यामुळे दादरमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला होता. तीन तासांनंतर गर्दीला पांगवण्यात पोलिसांना यश आले.
कबुतरांना उघडय़ावर खाद्य घालण्यास न्यायालयाने बंदी घातल्याने पालिकेने दादर येथील कबुतरखाना बंदिस्त केला. दाणे टाकणाऱयांवर नजर ठेवण्यासाठी पालिकेने सुरक्षा रक्षकही नेमले असून पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
आंदोलन रद्द करून थेट हल्लाबोल
आज सकाळी श्री शांतीवन जैन मंदिर येथे मोठय़ा संख्येने जैन समुदाय तसेच पक्षीप्रेमींना एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र हा विषय न्यायालयीन असल्याने पोलिसांनी परवानगी नाकारली होती. दरम्यान, आंदोलन करणार नाही असे तेथे जमलेल्यांनी सांगितले. मात्र अचानक मोठय़ा संख्येने महिला व पुरूष तेथे एकवटले आणि त्यांनी घोषणाबाजी करत थेट कबुतरखान्यावर हल्लाबोल केला, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
श्री शांतीवन जैन मंदिराच्या खिडक्यांना जाळ्यांनी झाकले
कबुतरांची विष्ठा व पिसांमुळे आरोग्याला धोका निर्माण होत असल्याने शहरातील कबुतरखाने बंद करण्याचे निर्देश पालिकेला देण्यात आले होते. परंतु हा जुलमी निर्णय मागे घ्यावा, अशी जोरदार भूमिका जैन समुदायाने घेतली आहे. असे असताना श्री शांतीवन जैन मंदिराच्या खिडक्या मात्र जाळ्या लावून बंद करण्यात आल्या आहेत. कबुतरे आत घुसू नयेत याकरिता ही सोय करण्यात आली आहे. याकडे नागरिकांकडून बोट दाखवले जात आहे. एका बाजूने कबुतरांसाठी लढा लढायचा आणि दुसरीकडे कबुतरे आत येऊ नयेत यासाठी मंदिराच्या खिडक्यांना जाळ्या लावायच्या हा काय प्रकार आहे, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
पालिकेने पक्षीपेमींना विश्वासात न घेता अचानक कबुतरखाना बंद केल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली. त्यामुळे सरकारला बॅकफूटवर येण्याची वेळ येत आहे.
– किशोरी पेडणेकर, शिवसेना प्रवक्ता
ते जैन बांधव नाहीत, बाहेरच्या लोकांनी आंदोलन केले – लोढा
कबुतरखान्याजवळ आंदोलन करणारे लोक जैन बांधव नसून बाहेरच्या लोकांनी येऊन आंदोलन केल्याचे या वेळी सहपालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. जैन ट्रस्टींसोबत आपण बोललो असून त्यांच्या कार्यकर्त्यांचा, समाज बांधवांचा या आंदोलनात सहभाग नसल्याचे त्यांनी सांगितल्याचे लोढा म्हणाले. या ठिकाणी झालेल्या गोंधळाची चौकशीही पोलीस करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
भाजप राजकीय पोळी भाजतेय, जैन समाजाला फसवतेय – वडेट्टीवार
कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि जैन समाज त्याविरोधात रस्त्यावर उतरल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते आपल्याच सरकारच्या निर्णयाविरुद्ध भूमिका घेत आहेत. अशी दुटप्पी भूमिका घेऊन भाजप जैन समाजाला फसवतेय, आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कबुतरखान्यांच्या प्रश्नावर राजकीय पोळी भाजतेय, असा आरोप कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज केला.
सुदैवाने अनुचित प्रकार घडला नाही
जैन समुदायातील महिला व पुरुष एकटवल्यानंतर महिलांच्या हातात चाकू, सुरे देण्यात आले. ते घेऊन महिला आंदोलक कबुतरखान्यात तेथील लोखंडी सरंक्षक गजावर चढून आत घुसल्या. तेथे तैनात महिला पोलिसांनाही न जुमानता त्यांनी चाकूनेच बांबूना बांधलेल्या रस्सी कापण्यास व ताडपत्री फाडण्यास सुरुवात केली. त्या वेळी प्रचंड गर्दी व गदारोळ माजला होता. सुदैवाने त्या गदारोळात कुठला अनुचित प्रकार घडला नाही. दरम्यान, घडल्या प्रकाराची पोलीस डायरीत रीतसर नोंद केली जाईल. कबुतरखान्यातील बांबूंची तोडपह्ड व ताडपत्री फाडल्याबाबत तसेच कबुतरांना दाणे टाकल्याबाबत पालिकेकडून तक्रार आल्यास त्यानुसार गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.