जयपूरमध्ये चार मजली इमारत कोसळली; वडील आणि मुलीचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती

राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये शनिवारी एक चार मजली इमारत अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील वडील आणि मुलीचा मृत्यू झाला, तर ७ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याचे सांगण्यात येत  आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास सुभाष चौक सर्कल येथील बाल भारती शाळेच्या मागे ही घटना घडली. आत्तापर्यंत पाच जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर दोघांचा मृत्यू झाला असून प्रभात आणि त्यांची ६ वर्षीय मुलगी पिहू अशी मृतांची ओळख पटली आहे. तर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान तेथील स्थानिक लोकांनी तात्काळ घटनेची माहिती पोलीस आणि प्रशासनाला दिली. त्यामुळे पोलीसांचे पथक, नागरी संरक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचाव कार्य सुरू केले. या दरम्यान ५ जणांना वेळीच बाहेर काढण्यात आले, ज्यामुळे त्यांचे प्राण वाचले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी जेसीबी आणि इतर उपकरणांची मदत घेतली जात आहे.