नवीन संसद म्हणजे मोदी मल्टिप्लेक्स, जयराम रमेश यांची टीका

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर नवीन संसदेचं उद्घाटन करण्यात आलं. त्यावरून काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी नवीन संसद म्हणजे मोदी मल्टिप्लेक्स असल्याची टीका केली आहे. जर एखादी संरचना लोकशाही संपवू शकत असेल तर पंतप्रधानांनी हे काम आधीच केलं आहे, असंही जयराम रमेश यावेळी म्हणाले आहेत.

जयराम रमेश यांनी पुढे टीका करताना म्हटलं की, नवीन संसद भवन इतकं मोठं आहे की खासदारांना एकमेकांना पाहायला दुर्बिणी घ्याव्या लागतील. जुन्या संसदेत असं नव्हतं. जुन्या संसदेत दोन्ही सभागृह, सेंट्रल हॉल आणि त्यांच्या आवारात फिरता येत असे. एकमेकांशी सहज संवाद साधता येत होता. नवीन संसदेने हा दुवा नष्ट केला आहे. जुन्या संसदेत जर एखादा माणूस रस्ता चुकला तर त्याला तो शोधणं सोपं होतं, कारण संसद गोलाकारात आहे. पण, नवीन संसद हा भूलभुलैय्या असून जर त्यात माणूस हरवला, तर त्याला रस्ता सापडणार नाही. नवीन संसदेत येण्याची अजिबात उत्सुकता वाटत नाही, जशी ती जुन्या संसदेत वाटत होती, असं जयराम रमेश म्हणाले आहेत.

2024च्या सत्ता परिवर्तनानंतर नवीन संसद भवनाचा अधिक चांगला उपयोग करण्याचे मार्ग शोधले जातील. नवीन संसदेचं उद्घाटन ज्या प्रकारे केलं गेलं, त्यातून पंतप्रधान मोदींचा उद्देश सफल झाला. त्यामुळे नवीन संसदेला खरंतर मोदी मल्टिप्लेक्स किंवा मोदी मॅरियट म्हटलं जायला हवं. 4 दिवसांच्या संसदेच्या कार्यवाहीनंतर मला जाणवलं की संसदेत एकमेकांशी संवाद साधण्यासाठी जागाच नाही, असं संसदेच्या दोन्ही सभागृहात घडताना मी पाहतो आहे, असं जयराम रमेश म्हणाले.