भाजप सरकार आधी चांगल्या धोरणाला विरोध करते, नंतर जनतेच्या दबावाखाली स्वीकारते; जयराम रमेश यांची टीका

भाजप सरकार आधी चांगल्या धोरणाला विरोध करते, नंतर जनतेच्या दबावाखाली ते स्वीकारते, जातीनिहाय जनगणनेवरून अशी टीका काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी मोदी सरकारवर केली आहे. X वर एक पोस्ट करत त्यांनी ही टीका केली आहे.

जयराम रमेश म्हणाले की, “गेल्या अनेक वर्षांपासून जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा दाबून टाकणाऱ्या आणि त्याची टिंगलटवाळी करणाऱ्या मोदी सरकारला अखेर काँग्रेस नेते राहुल गांधी, काँग्रेस पक्ष आणि असंख्य सामाजिक कार्यकर्ते, संघटनांच्या अथक लढ्यापुढे झुकावे लागले आहे. जनतेच्या प्रचंड दबावामुळे आणि विरोधकांच्या सातत्यपूर्ण संघर्षामुळे केंद्र सरकारने अखेर जातीनिहाय जनगणना घेण्यास सहमती दर्शवली आहे.”

जयराम रमेश म्हणाले आहेत की, “मोदी सरकारकडे स्वतःचे कोणतेही व्हिजन नाही किंवा समस्या सोडवण्याची कोणतीही दिशा नाही. परंतु ते केवळ जनतेचे लक्ष विचलित करण्यात, खऱ्या मुद्द्यांपासून पळून जाण्यात आणि आपला फुटीरतावादी अजेंडा राबवण्यात तज्ज्ञ आहेत.”

आपल्या X पोस्टमध्ये जयराम रमेश यांनी इतिहासाची आठवण करून देत भाजपवर एकामागून एक हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, अपयशाचे स्मारक, असं मनरेगाबद्दल संसदेत पंतप्रधान म्हणाले होते. ज्या मनरेगाला जग ग्रामीण रोजगार आणि गरिबी निर्मूलनाचे मॉडेल म्हणत होते, त्याची खिल्ली उडवली जात होती. लोक खड्डे खणत आहेत असे म्हटले जात होते. पण जेव्हा कोविड-19 सारखी आपत्ती आली, तेव्हा तीच मनरेगा देशातील गरिबांसाठी आधार बनली. यानंतर सरकारने आपले बजेट वाढवून त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला.

जयराम रमेश पुढे म्हणाले की, आधारच्या बाबतीतही असेच घडले. ते म्हणाले की, “जेव्हा भाजप विरोधी पक्षात होता तेव्हा ते म्हणायचे की हे गोपनीयतेला धोका आहे आणि फक्त एक राजकीय स्टंट आहे. परंतु सत्तेत आल्यानंतर त्यांनी त्याच आधार कार्डला संपूर्ण कल्याणकारी व्यवस्थेचा पाया बनवलं.”