जालन्यातील महामार्गावरील पेट्रोल पंप दरोडा प्रकरणात, चार तासात दरोडेखोरांचा पर्दाफाश

जालना शहराजवळील जालना ते देऊळगावराजा महामार्गावरील जामवाडी येथील पेट्रोलपंपावर पाच दरोडेखोरांनी सुरक्षारक्षकासह कर्मचार्‍यांना खंजीर व एअरगनचा धाक दाखवून मारहाण करत 32 हजार रुपये चोरुन नेले होते. याप्रकरणी पोलीस ठाणे तालुका जालना येथे विनायक सखाराम काळे रा. काद्राबाद जालना यांच्य़ा तक्रारीवरुन कलम 395 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेवून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दरोडेखोरांची शोध मोहिम हाती घेवून अवघ्या चार तासात पाच आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांच्या ताब्यातून दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

जालना ते देऊळगावराजा या महामार्गावरील मौजे जामवाडी शिवारातील इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर 14 जुलै रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास अज्ञात पाच आरोपीतांनी पेट्रोल पंपावरील वॉचमन व कर्मचारी यांना खंजीर व एअर गनचा धाक दाखवुन त्यांना मारहाण करुन 32 हजार रुपये जबरीने चोरुन नेले होते. सदरील दरोड्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी पेट्रोलपंपावर भेट देऊन गुन्हे शाखेचे पथके तयार करुन पथकातील अधिकारी व अमलदार यांना सदर चा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना व मार्गदर्शन केले होते. त्या अनुषंगाने 15 जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदार हे तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारामार्फत दरोड्यातील आरोपींची माहिती घेत असतांना सदरचा गुन्हा हा गणेश प्रल्हाद विधाते रा. लालबाग जालना याने त्याचे साथीदारासह केल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहिती आधारे तात्काळ आरोपी गणेश विधाते यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यासंदर्भात कसून चौकशी केली असता त्याचा साथीदार सावेर सय्यद निसार सय्यद रा. चंदनझिरा जालना,कैसर ऊर्फ सोनु सांडु शेख रा. मियासाब दर्गा मस्तगड जालना, योगेश एकनाथ खणपटे रा. जमुनानगर जालना, शेख आजम शेख मुख्तार रा. जमुना नगर जालना यांच्यासोबत मिळून शुक्रवारी 14 जुलै रोजी संध्याकाळी एकत्रित येवुन पेट्रोलपंप लुटण्याचे ठरविले.

सर्व आरोपी त्यानंतर जालना-देऊळगाव राजा रोड जवळ दरोडा टाकण्यासाठी उपयोगी असलेले दोन चाकू, एक एअरगन असे सोबत घेऊन त्यांचा दोन मोटार सायकलवर पेट्रोलपंपातील कॅबीनमध्ये जावून तेथील पेट्रोलपंपावर काम करणार्‍या दोन इसमांना चाकुचा धाक दाखवून मारहाण केली. त्यांचे गल्ल्यातील व खिश्यातील पैसे लुटल्याचे सागितले. त्यानंतर गुन्ह्यातील इतर साथीदारांना वेगवेगळया ठिकाणावरून शिताफीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडुन गुन्ह्यात वापरलेले दोन चाकु, एक एअरगन, दोन मोटार सायकली, मोबाईल फोन व गुन्हयात लुटलेली रोख रक्कम असा एकुण 1 लाख 36 हजार 500 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच यातील आरोपी गणेश प्रल्हाद विधाते, कैसर ऊर्फ सोनु सांडु शेख व ईतर एक आरोपी असे तिघांनी मिळून कदीम जालना पोलीस ठाण्यातील येथील कलम 392,34 भादंवि हा गुन्हा केल्याचे मान्य केले असल्याने तो गुन्हा देखील उघडकीस आला आहे. पाचही आरोपींना पुढील तपासकामी तालुका पोलीस ठाण्यात येथे हजर करण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, सहायक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे, कृष्णा तंगे, सागर बाविस्कर, दत्तात्रय वाघुंडे, सचिन चौधरी, प्रशांत लोखंडे, योगेश सहाने, धिरज भोसले सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केली आहे.