खड्डा चुकविण्याच्या गडबडीत कार थेट पुलाखाली

जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरतील जाफ्राबाद मधील पुलावरील खड्डा चुकविण्याच्या नादात बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास एक मारुती अल्टो ही कार खाली कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसून वाहनातील चालक सुखरूप आहे.

यावेळी कार पुलाखाली गेल्यामुळे तत्काळ नागरिकांनी धावपळ करत चालकाला बाहेर काढले व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी पुलावर बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.

पुलाखाली जाणारी मारुती कार ही आलापूर मधील असल्याचे कळते आहे. पुलावरून जात असताना पुलावरील मोठ्या खड्ड्यामुळे चालक गोंधळला. या गोंधळात त्याची कार पुला शेजारी असलेल्या घसगुंडी सारख्या भागावरून सरकत खाली गेली. काही काळानंतर नागरिकांच्या साह्याने कार पुलाखालून काढून दुरुस्ती साठी रवाना केली.

भोकरदन-जाफराबाद पुलाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

भोकरदन शहरातील विदर्भाला जोडणारा जाफराबाद रोडवरील पूल रहदारीसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. या पुलाविषयी अनेक तक्रारी, निवेदने देऊन सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे याठिकाणी किरकोळ अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तरी सदर पुलाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आतातरी लक्ष देणार का? की मूग गिळून गप्प बसणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या