
जालना शहरात मंगळवारी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाची धामधूम सुरू असताना 14 ते 15 वर्षे वयोगटातील तीन शालेय मित्र सकाळी सात वाजेच्या सुमारास घरातून अचानक गायब झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली. अंकीत प्रकाश जाधव (15) रा. सिंचन वसाहत, जुना जालना, हर्षद अशोक देवकर (14), रा. कसबा, गांधीचमन आणि स्वराज संतोष मापारी (14) रा. घायाळनगर असे बेपत्ता झालेल्या मुलांची नावे आहेत. घटना घडून चोवीस तास उलटल्यानंतरही या मुलांचा अद्याप शोध लागला नाही. याप्रकरणी कदिम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसही शोध घेत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, मंगळवारी 15 ऑगस्ट रोजी सकाळी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात जाण्यासाठी शाळकरी मुले, शासकीय कर्मचार्यांची सकाळपासूनच लगबग सुरू होती. सकाळी सात वाजेच्या सुमारास हर्षद देवकर आणि स्वराज मापारी ही दोन मुले सिंचन वसाहतीत आली. त्यांनी मित्र अंकीतला बाहेरून आवाज दिला. त्यावेळी अंकीत झोपलेला होता, परंतू आवाज ऐकल्यानंतर वडीलांनी अंकीतला उठवून मित्र आल्याचा निरोप दिला. अंकीतने बाहेर येवून मित्रांची भेट घेतली आणि लवकरच जायचे म्हणत आंघोळ करण्यासाठी निघून गेला. इकडे त्याचे आई, वडीलही झेंडावंदनासाठी जवळच असलेल्या कार्यालयात निघून गेले. इकडे अंकीतही बाहेर आला. त्याने स्कुटी (क्र.एम.एच.21-ए.वाय.1238) घेवून बाहेर उभे असलेल्या दोघांसमवेत निघून गेला. कार्यक्रमाहुन परतल्यानंतर अंकीतची शोधाशोध सुरू झाली. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनूसार यातील दोघे नवयुवक शाळेत तर तिसरा सीटीएमके शाळेत शिकतो. यातील दोघे एका खाजगी शिकवणीही सोबतच शिक्षण घेत असल्याची माहिती मिळाली आहे. तथापि, याप्रकरणी अंकीतचे वडील प्रकाश जाधव यांनी काल रात्री कदिम जालना पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्यावरून अज्ञात आरोपीविरूध्द भादंवि. 363 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक ज्ञानदेव नागरे हे करीत आहे.



























































