नातेवाईकाच्या द्वार दर्शनाहून घरी परतत असताना भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. जळगावमधील नशिराबाद ते भुसावळ दरम्यान रविवारी दुपारी हा अपघात घडला. दीपक सूर्यवंशी असे मयत व्यक्तीचे नाव आहे. धडक दिल्यानंतर कारने दीपक यांना दीड किमी फरफटत नेले.
दीपक सूर्यवंशी यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली आहेत. रावेर येथे एका नातेवाईकाचे निधन झाल्याने सूर्यवंशी हे सासऱ्यांसह गेले होते. नातेवाईकाचे द्वार दर्शन आटोपून सूर्यवंशी घराकडे निघाले. सासऱ्यांना घरी सोडून ते आपल्या घरी परतत असतानाच गावापासून सात ते आठ किमी अंतरावर काळाने त्यांच्यावर झडप घातली.
नशिराबाद ते भुसावळ दरम्यान वैद्यकीय महाविद्यालयाजवळील उड्डानपुलावर सूर्यवंशी यांच्या दुचाकीला कारने धडक दिली. यानंतर सूर्यवंशी यांना दीड किमी फरफटत नेले. सूर्यवंशी यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.