जालना- गर्दी जमू नये म्हणून लढवली शक्कल, झाडाच्या पारांवर टाकलं काळं वंगण

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. नागरिकांनी घरातच बसावे, काळजी घ्यावी, असे प्रशासन वारंवार आवाहन करत आहे. मात्र, काही नागरिक घराबाहेर येत आहेत. नागरिकांनी घराबाहेर येऊन बसू नये यासाठी जालना तालुक्यातील रामनगर येथे शक्कल लढवण्यात आली आहे. गावात गर्दी होणाऱ्या अनेक पारावर वंगण टाकण्यात आलं आहे. जेणेकरून कपडे मळतील या भितीने कुणीही त्यावर बसणार नाही.

शहरातील नागरिकांची रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी पोलीस प्रशासन काम करीत आहे. मात्र, ग्रामीण जनतेचे काय? हा प्रश्न पडला आहे. त्यामुळे जालना तालुक्यातील रामनगर (साखर कारखाना) येथे गावामध्ये मारुतीच्या पारावर (मंदिराचा ओटा) एका दक्ष नागरिकाने वंगण टाकले आहे. गावातील मंदिराचा पार हा गप्पा मारण्यासाठी ठरलेले ठिकाण असते. सकाळी आठ नऊ वाजेच्या सुमारास आणि सायंकाळी पाच नंतर या पारावर गावकऱ्यांच्या चर्चा आणि गप्पांची देवाणघेवाण रंगते. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात गर्दी जमते. वारंवार सांगूनही गर्दी कमी होत नसल्याचं चित्र दिसत होतं.

त्यामुळे या पारावर बैलगाडीच्या चाकात घालायचे वंगण टाकले आहे. हे वंगण जसेजसे ऊन तापल तसे गरम होते. त्यामुळे येथे कोणी बसलेच तर त्याला चांगलेच चटकेही बसतात. वंगणाचा डाग कपड्यावर लागला तर कधीही निघत नाहीत. त्यामुळे या पारावर बसणाऱ्यांची गर्दी आता बंद झाली आहे. तसेच गावात औषधाची धूर फवारणी सुरू झाली आहे. रामनगर हे छोटेसे खेडे मात्र कोरोना संदर्भात अत्यंत जागरूक झाले आहे. गावात येणाऱ्यांची कसून तपासणी केली जात आहे. एवढेच नव्हे तर ग्रामपंचायतीकडे या सर्व बाबींची नोंद देखील आहे.

आपली प्रतिक्रिया द्या