जालना जिल्ह्यात गर्भपाताच्या गोळ्या आणि व्हायग्राची अवैध विक्री, एकाला अटक

गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्या तसेच व्हायग्राची अवैधरीत्या विक्री करणाऱ्या एकाला जालना जिल्ह्यात अटक झाली आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन जालनाच्या वतीने 25 जुलै रोजी जालना जिल्ह्यातील जालना-अंबड रोडवरील पारनेर फाट्यावर करण्यात आली.

जालना अन्न व औषध प्रशासनाच्या औषध निरीक्षक अंजली मंगलअप्पा मिटकर या जालना-अंबड रोडवरील घाऊक औषध दुकानाची तपासणी करीत होत्या. गुप्त खबऱ्याच्या माहितीवरून त्यांनी ही तपासणी सुरू केली होती. दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास पारनेर फाट्यावर मोटार सायकलवर दोन जण संशयितरित्या फिरताना दिसले.

त्यातील एकाच्या पिशवीत गुंगीकारक गर्भपात करणारी व पुरूषांमध्ये कामवासना वाढविण्यासाठी वापरण्यात येणारी विविध औषधे त्यांना आढळून आली. त्यांनी त्यास नाव विचारले असता मो. शोहेब मो. आसिफ (रा. रोडा, ता. चिखली, जि. बुलढाणा) असे सांगितले.

त्याच्याकडे ही औषधे खरेदी किंवा विक्रीसाठीचा परवाना नव्हता. त्यामुळे औषधे अवैधरित्या खरेदी करून, अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याबद्दल मोहम्मद शोहेब मो. आसिफ हा आणि अन्य एकाविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात औषध निरीक्षक अंजली मिटकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली. त्याचा सहकारी मात्र फरार झाल्याची माहिती मिळत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या