
आंदोलकाच्या कमरेत लाथ मारणे जालना पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांना चांगलेच भोवणार आहे. या घटनेची मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेतली असून याची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश आयोगाने जालना पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.
आयोगाचे अध्यक्ष ए.एम. बदर यांनी हे आदेश दिले. चार आठवडय़ांत ही चौकशी करून त्याचा अहवाल सादर करा, असेही आयोगाने पोलीस अधीक्षकांना सांगितले आहे. यावरील पुढील सुनावणी 22 सप्टेंबरला होणार आहे.
मंत्री पंकजा मुंडे यांना भेटण्याचा प्रयत्न करत असताना अमित चौधरी व गोपाळ चौधरी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना घेऊन जात असताना पोलीस उपअधीक्षक कुलकर्णी मागून आले आणि त्यांनी एका आंदोलकाच्या कमरेत जोरात लाथ मारली. याने संविधानिक मूलभूत अधिकारांचा भंग होत आहे, अशी तक्रार वंचित बहुजन आघाडीने आयोगाकडे केली आहे.
नुकसानभरपाई का देऊ नये? अतिरिक्त मुख्य गृह सचिवांना नोटीस
या घटनेत लाथ बसलेल्या आंदोलकाला नुकसानभरपाई का देऊ नये? पोलीस उपअधीक्षक कुलकर्णी यांच्यावर फौजदारी कारवाई का करू नये, त्यांची खातेनिहाय चौकशी का करू नये, या सर्वांचा खुलासा करा, अशी ‘कारणे द्या’ नोटीस आयोगाने अतिरिक्त मुख्य गृह सचिव व जालना पोलीस अधीक्षक यांना धाडली आहे. पुढील सुनावणीआधी या नोटीसचे प्रत्युत्तर सादर करा, असेही आयोगाने आदेशात नमूद केले.